भारतीय संघातील अष्टपैलू युवराज सिंग बऱ्याच दिवसांपासून संघाबाहेर आहे. संघात स्थान मिळवण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरु आहेत. रणजी सामन्यातून माघार घेत त्याने निवड समितीचा रोष ओढावून घेतल्यामुळे देखील युवराज चर्चेत आला. अर्थात या सर्व प्रकारानंतर युवराजचा क्रिकेटचा पुढील प्रवास कसा असेल, असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना नक्कीच पडला असेल. सध्याच्या घडीला त्याच्या पुनरागमनाबाबत ठाम काही सांगता येत नसले, तरी युवराजच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे.

ग्वाल्हेर आयटीएम विद्यापीठाच्या वतीने युवराज सिंगला ‘मानद डॉक्टरेट’ पदवी देऊन सन्मानित करण्यात आले आहे. क्रिकेटच्या मैदानातील योगदानबद्दल त्याचा गौरव करण्यात आला. या सन्मानानंतर युवराजने विद्यापीठाचे आभार मानले. ही पदवी मिळाल्याचा अभिमान वाटतोय या सन्मानामुळे माझ्यावरील जबाबदारी वाढली असून, आगामी काळात ही पदवी माझ्यासाठी प्रेरणादायी ठरेल, असे त्याने म्हटले आहे.

यापूर्वी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याला आसाम विद्यापीठ आणि महेंद्रसिंह धोनीला मोंटफोर्ड विद्यापीठाकडून डॉक्टरेट उपाधी देऊन गौरवण्यात आले होते. याशिवाय भारताचा माजी क्रिकेटर आणि टीम इंडियाची वॉल असे बिरूद मिळवणाऱ्या राहुल द्रविडने बंगळुरु विद्यापीठाकडून ‘डॉक्टरेट’ स्वीकारण्यास नकार दिला होता. डॉक्टरेट मिळवण्यासाठी आवश्यक अशी कोणतीही भरीव कामगिरी केलेली नसताना, अशी डॉक्टरेट स्वीकारण्याऐवजी आपण खेळाच्या क्षेत्रात संशोधन करुन डॉक्टरेट मिळवण्याचा प्रयत्न करु, अशी विनम्र प्रतिक्रिया द्रविडने दिली होती. ३० जून २०१७ ला युवीने वेस्ट इंडिजविरुद्ध अखेरचा वनडे सामना खेळला होता. या सामन्यात त्याने ५५ चेंडूत ४ चौकारांच्या मदतीनं ३९ धावांचे योगदान दिले.