भारताचा माजी वेगवान गोलंदाज अमित भंडारी यांना काही गुंडांनी मारहाण केल्याची घटना सोमवारी घडली होती. या प्रकरणी क्रिकेटपटू अनुज डेढा याला अटक करण्यात आली. २३ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धांसाठी त्याची संघात निवड न केल्यामुळे त्याने गुंड आणून भंडारी यांना मारहाण केली होती, असे भंडारी यांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

अनुज आणि त्याचा भाऊ यांना पोलिसांनी अटक केली असून इतर गुंडांचा शोध सुरु असल्याचे इंडिया टुडेच्या वृत्तानुसार समजत आहे. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेच्या (DDCA) वरिष्ठ संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष असलेले भंडारी यांची सोमवारी दोन माणसांशी बाचाबाची झाली. त्यानंतर हॉकी स्टिक, सायकलची चेन आणि तत्सम गोष्टी घेऊन आलेल्या सुमारे १५ गुंडांनी त्यांना मारहाण केली. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला आणि कानाला दुखापत झाली असून सहकारी सुखविंदर सिंग यांनी त्यांना संत परमानंद रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर संघात न निवडण्याचे कारण विचारल्यानंतर प्रशिक्षक भंडारी यांनीच पहिले बॅटने वार केला होता, अशी माहिती ‘नवभारत टाइम्स’च्या वृत्तानुसार हल्ला करणाऱ्या अनुजने दिली आहे.

२३ वर्षाखालील मुलांचे सराव सामने दिल्लीच्या सेंट स्टीफन्स मैदानावर सुरु आहेत. या मैदानावर सोमवारी सकाळी ही घटना घडली होती. त्यावेळी २ माणसे त्यांना भेटण्यासाठी आली. त्यांच्याबरोबर भंडारी यांची शाब्दिक चकमक झाली. यानंतर ते दोघे तेथून निघून गेले. त्यानंतर काही वेळातच सुमारे १५ गुंड सायकलची चेन, रॉड आणि हॉकी स्टिक्स घेऊन मैदानात आले आणि त्यांनी भंडारी यांच्यावर हल्ला केला.

मैदानावर असलेले खेळाडू आणि सहकारी यांनी हे थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना गोळी मारून ठार करण्याची धमकी देण्यात आली, असे २३ वर्षाखालील वरिष्ठ संघाचे संघ व्यवस्थापक शंकर सैनी यांनी सांगितले होते. दरम्यान, या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत गुंडानी तेथून पळ काढला होता.