भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमध्ये होणाऱ्या क्रिकेट सामन्याची क्रीडा विश्वात चर्चा असतानाच श्रीलंका- बांग्लादेश क्रिकेट सामन्यानेही सर्वांचं लक्ष वेधलं आहे. श्रीलंकेच्या क्रिकेट संघातील पट्टीचा फिरकी गोलंदाज रंगना हेरथ या सामन्यात चमकला असून, बांग्लादेश विरोधात खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या कसोची सामन्यात हेरथने एक इतिहास रचला आहे. पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज वसिम अक्रम यांच्या सर्वाधिक विकेट घेण्याच्या विक्रमाला हेरथने मागे टाकलं आहे.

शेर-ए-बांग्ला स्टेडियममध्ये बांग्लादेशच्या तैजुल इस्लामला झेलबाद करत हेरथने ही ऐतिहासिक कामगिरी केली. हेरथच्या या विक्रमी कामगिरीसोबतच श्रीलंकेच्या संघाने बांग्लादेशचा दुसऱ्या कसोटी सामन्यात २१५ धावांनी विजय मिळवला. कसोटी क्रिकेटमध्ये डावखुऱ्या गोलंदाजांमध्ये सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत हेरथ अग्रस्थानी पोहोचला असून, त्याने आतापर्यंत एकून ४१५ गडी बाद केले आहेत. तर वसिम अक्रम यांच्या नावे ४१४ गडी बाद करण्याचा विक्रम होता. हेरथने ही उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही त्याला शुभेच्छा दिल्या.

सामन्याचा आढावा
हेरथने घेतलेला बळी हा श्रीलंका- बांग्लादेशमध्ये खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील शेवटचा बळी ठरला. या सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये हेरथच्या नावे एकाही विकेटची नोंद करण्यात आली नव्हती. पण, दुसऱ्या इनिंगमध्ये मात्र तो पुन्हा फॉर्ममध्ये आला आणि चार गडी बाद करत त्याने सामन्यात आपलं योगदान दिलं.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारे पहिले पाच डावखुरे गोलंदाज
रंगना हेरथ (श्रीलंका) – ४१५ बळी
वसिम अक्रम (पाकिस्तान)- ४१४ बळी
डॅनिअल व्हिटोरी (न्यूझीलंड)- ३६२ बळी
चामिंडा वास (श्रीलंका)- ३५५ बळी
मिचेल जॉन्सन (ऑस्ट्रेलिया)- ३१३ बळी