बांगलादेशी लेखिका तस्लीमा नासरीन यांनी इंग्लंडचा क्रिकेटपटू मोईन अलीबद्दल एक वादग्रस्त ट्विट केले आहे. ”मोईन अली क्रिकेटमध्ये अडकला नसता, तर तो आयसीसमध्ये सामील होण्यासाठी सिरियाला गेला असता”, असे ट्विट नासरीन यांनी केले होते. या ट्विटनंतर नासरीन यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. अनेकांनी त्यांच्या या ट्विटला तिखट उत्तर दिले. आता मोईन अलीचा संघसहकारी आणि इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने नासरीन यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली आहे.

”तुम्ही ठीक आहात? मला, वाटत नाही, की तुम्ही ठीक आहात”, असे आर्चरने नासरीन यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. मोईन अलीसंबधी केलेल्या ट्विटनंतर नासरीन यांना नेटकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यानंतर नासरीन यांनी आपल्या ट्विटबाबत स्पष्टीकरण दिले.

 

नासरीन यांचे स्पष्टीकरण

”हे ट्विट उपहासाने केले गेले होते, हे टीकाकारांना चांगलेच ठाऊक आहे. परंतु त्यांनी मला अपमानित करण्याचे ठरवले, कारण मी मुस्लिम समाज सेक्युलर करण्याचा प्रयत्न करते आणि मी इस्लामिक धर्मांधतेला विरोध करते. मानवजातीची ही एक सर्वात मोठी शोकांतिका म्हणावी लागेल, की स्त्रीवादी डावे स्त्रीविरोधी इस्लामवाद्यांना पाठिंबा देत आहेत”, असे तस्लीमा नासरीन यांनी स्पष्टीकरणात म्हटले आहे.

 

कविता कृष्णन यांची प्रतिक्रिया

सीपीआयएमएलच्या नेत्या कविता कृष्णन यांनीही नासरीन यांच्या ट्विटवर तीव्र प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, की तस्लीमा यांना लेखक म्हणून नव्हे, तर कट्टर व्यक्ती म्हणून लक्षात ठेवले जाईल.

कोण आहे मोईन अली?

मोईन अली हा इंग्लंड क्रिकेट संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू आहे. सध्या तो आयपीएलच्या तयारीत व्यस्त असून यंदा तो चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसणार आहे. यापूर्वी अलील बंगळुरू संघाचा भाग होता. 2021च्या लिलावात चेन्नईने त्याला 7 कोटींमध्ये संघात घेतले.