करोना या विषाणूने जगभर हाहा:कार माजवला आहे. या विषाणूंची लागण झाल्याने लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. राजकीय नेते, खेळाडू आणि त्यांचा परिवारातील सदस्य यांनादेखील करोनाने विळखा घातल्याचे दिसून येत आहे. मागील आठवड्यात पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याला करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानेच यासंबंधीची माहिती ट्विट करून साऱ्यांना सांगितली. त्यानंतर आता एका क्रिकेटपटूच्या सासूला करोनाची लागण झाली आहे.

बांगलादेशचा माजी कर्णधार मश्रफी मोर्तझा याची सासू होस्ने आरा यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शनिवारी मोर्तझाच्या सासूची करोना तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर रविवारी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मोर्तझाच्या जन्मगाव असलेल्या नराली येथील डॉक्टरांनी याबाबतची माहिती दिल्याचे क्रिकट्रॅकरने म्हटले आहे. मोर्तझाच्या सासूला करोनाची लागण झाल्याचे समजताच त्यांना घरातच क्वारंटाइन करण्यात आले आहे. आरा यांची मुलगी सुमोना हक हिची छोटी बहिण रिपा हिलाही करोना झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सासूला करोनाची लागण झाल्याने मोर्तझा रविवारी झालेल्या ‘क्रिकेटर वेलफेयर एसोसिएशन ऑफ बांग्लादेश’च्या बैठकीस उपस्थित राहू शकला नाही. बांगलादेशी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मोर्तझा सध्या खूपच तणावात आहे. तसेच बांगलादेशी क्रिकेट संघात त्याच्याविरोधात वातावरण निर्माण होत असल्याचेही वृत्त आहे. करोनाच्या संकटकाळात लोकांच्या मदतीसाठी मोर्तझा काम करत आहे. त्याने त्याचे अर्धे मानधन संकटग्रस्त लोकांच्या मदतीसाठी दान केले आहे. तसेच मार्च महिन्यापासून तो लोकांना अन्नधान्याचे वाटप करत आहे. यासाठी त्याने १८ वर्षांपूर्वी खरेदी केलेले एक ब्रेसलेटही विकले होते. पण सुदैवाने एका चाहत्याने ते ब्रेसलेट खरेदी केले आणि मोर्तझालाच ते भेट म्हणून दिले.

मोर्तझाने काही दिवसांपूर्वी बांगलादेश संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्याच्या जागी संघाची धुरा तमीम इक्बालच्या खांद्यावर देण्यात आली आहे.