भारतात सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. काल राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज चेतन साकारियाच्या वडिलांचे करोनामुळे निधन झाले. आता क्रिकेटविश्वातून अजून एक दु:खद बातमी समोर आली आहे. फिरकीपटू आणि यंदाच्या आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचा सदस्य असलेल्या पीयूष चावलाच्या वडिलांचे करोनामुळे निधन झाले आहे.

 

काही दिवसांपूर्वी पीयूष चावलाचे वडील प्रमोद कुमार चावला करोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यांना दिल्लीतील मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची मृत्यूशी झुंज आज संपली. पीयूषने एका इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून आपल्या वडिलांच्या निधनाची बातमी दिली.

 

प्रमोद कुमार चावला हे १२ दिवसांपासून करोनाशी झुंज देत होते. रविवारी प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीच्या रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी मुरादाबादच्या खासगी कोविड रुग्णालयात नेण्यात आले होते. प्रमोदकुमार चावला मुरादाबादमधील विद्युत विभागातून निवृत्त झाले होते.

पीयूष चावलाची कारकीर्द

१९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेतून पीयूषने नाव कमावले. २००६मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. भारताकडून त्याने ३ कसोटी २५ वनडे आणि ७ टी-२० सामने खेळले आहेत. मागील वर्षी चेन्नई सुपर किंग्जकडून आयपीएल खेळल्यानंतर तो या वर्षी मुंबई संघात सामील झाला.