पाकिस्तान सुपर लीगमध्ये (पीएसएल) सहभागी होण्यासाठी यूएईला जाणारा पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार सरफराज अहमद याच्यासह ११ सदस्यांना विमानात चढण्याची परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे या सर्वांना पुन्हा हॉटेलमध्ये परत जावे लागले. सरफराज आणि अन्य ११ सदस्य अबूधाबीला लाहोर व कराची-दोहामार्गे जाणार होते. मात्र, आवश्यक मंजुरी न मिळाल्याने या सर्वांना विमानातील प्रवेश नाकारण्यात आला. मार्चमध्ये सुरू झालेला पीएसएल हंगाम करोनामुळे पुढे ढकलण्यात आला होता आणि अलीकडेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला यूएई सरकारकडून अबूधाबी येथे ही स्पर्धा खेळवण्याची परवानगी मिळाली होती.

हेही वाचा – ‘फ्लाइंग सिख’ रुग्णालयातून घरी, पत्नीला ICUत हलवले

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या अहवालानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला व्हिसा मिळण्यासह लॉजिस्टिकिकल संबंधित मुद्द्यांचा सामना करावा लागत आहे. हे सदस्य चार्ट विमानाने यूएईला जाणे अपेक्षित होते, मात्र बोर्डाने त्यांना व्यावसायिक विमानाने पाठवण्याचा निर्णय घेतला. स्थगित झालेल्या पीएसएलमध्ये फक्त १४ सामने खेळवले गेले होते. परवानगी नाकारलेला सरफराज अहमद हा पीएसएलमध्ये क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाचा कर्णधार आहे.

 

हेही वाचा – जबरदस्त क्रिकेट कारकीर्द असूनही क्रिकेटच्या देवाला वाटतेय ‘या’ दोन गोष्टींची खंत!

या अहवालानुसार, या पीएसएल टीममधून पाच जणांना जाण्याची परवानगी देण्यात आली आहे, तर २४ मेपासून क्वारंटाइनमध्ये असलेल्या इतरांना हॉटेलमध्ये परतावे लागले आहे. दोन्ही शहरांतील २५हून अधिक खेळाडू चार्टर्ड फ्लाइटद्वारे यूएईला जाणार होते. परंतु पीसीबीने त्यांना व्यावसायिक विमानांद्वारे पाठविण्याची निवड केली.