भारताची युवा स्फोटक फलंदाज शफाली वर्माने टी-२० क्रिकेटनंतर आता कसोटी क्रिकेटमध्ये आपली छाप पाडायला सुरुवात केली आहे. ब्रिस्टल येथे खेळल्या जाणार्‍या एकमेव कसोटी सामन्यात इंग्लंडविरूद्ध पदार्पण करताना १७ वर्षाच्या शफालीने ९६ धावांची शानदार खेळी केली. अवघ्या चार धावांनी तिचे शतक हुकले, परंतु या खेळीमुळे तिने आपल्या नावावर अनेक विक्रम नोंदवले आहेत. कसोटी सामन्यात सर्वात मोठा खेळी खेळणारी शफाली ही पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.

पदार्पणाच्या कसोटी सामन्यात ७५ धावा काढणाऱ्या चंद्रकाता कॉलचा विक्रम शफालीने मोडला. ९६ धावांवर असताना केट क्रॉसचा ती बळी ठरली. मी माझे वय मोजत नाही, मी आत्मविश्वासाने मैदानावर उतरते, असे शफालीने सांगितले.

हेही वाचा – WTC Final Day 1 Live : निराशा..! पावसामुळे पहिल्या सत्राचा खेळ वाया

मोठे फटके खेळण्यासाठी १० ते १५ रूपयांचे बक्षीस

शफालीने तिच्या डावात १५२ चेंडूत १३ चौकार आणि २ षटकार लगावले. मोठे फटके खेळण्याच्या तंत्राविषयी शफालीने पत्रकार परिषदेत एक खुलासा केला. ती म्हणाली, ”माझे वडील मला आणि माझ्या भावाला मोठे फटके खेळण्यासाठी १० ते १५ रूपये दयायचे. या कारणास्तव, लहानपणापासूनच मी षटकार मारण्यासाठी खूप सराव केला होता.” शफाली आणि स्मृती मंधाना यांनी पहिल्या विकेटसाठी १६७ धावांची उत्कृष्ट भागीदारी करत भारतासाठी भक्कम धावसंख्या गाठून दिली. कसोटी क्रिकेटमधील पहिल्या विकेटसाठीची ही भारताची सर्वोच्च भागीदारी ठरली.

शफाली आणि स्मृतीचा नवा विक्रम

शफाली आणि स्मृती यांनी गार्गी बॅनर्जी आणि संध्या अग्रवाल यांचा १५३ धावांचा विक्रम मोडला. १९८४मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मुंबई कसोटी सामन्यात त्यांनी ही भागीदारी रचली होती. शफालीच्या रूपात भारताला पहिला धक्का बसला. ती बाद झाल्यानंतर भारतीय डाव गडगडला आणि १६ धावांच्या आत भारताचे चार फलंदाज बाद झाले. शेफालीनंतर स्मृती मंधानासुद्धा ७८ धावांवर बाद झाली. यानंतर पूनम राऊत (२), शिखा पांडे (०) आणि कर्णधार मिताली राज (२) धावा फटकावून तंबूत परतले. दुसर्‍या दिवसाचा खेळ संपताच भारताने ५ गडी गमावून १८७ धावा केल्या.