भारतीय संघाचा नव्या दमाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याच्या वडिलांचे २० नोव्हेंबरला निधन झाले. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांत ही घटना घडली. वडिलांच्या निधनामुळे मायदेशात परतण्याचा पर्याय सिराजला BCCIकडून देण्यात आला होता. परंतु त्याने संघासोबत ऑस्ट्रेलियातच थांबण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयाचे अनेकांनी कौतुक केले. ऑस्ट्रेलियात आपली चमक दाखवून भारतीय संघ नुकताच मायदेशात दाखल झाला. सिराजने भारतात परतताच घरी न जाता थेट दफनभूमीत जाऊन वडिलांना श्रद्धांजली वाहिली.

सिराजने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या चौथ्या सामन्यात उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली. त्याने मोक्याच्या क्षणी एका डावात ५ बळी मिळवले. त्याच्या कामगिरीचा सर्वत्र उदो उदो करण्यात आला. त्यानंतर सिराज भारतात दाखल झाल्यावर त्याने आपल्या घरी न जाता आधी दफनभूमीला भेट दिली. राजीव गांधी विमानतळावरून तो थेट खैरताबादच्या दफनभूमीत गेला. तेथे त्याने आपल्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली. त्याचे वडिल पेशाने रिक्षाचालक होते. फुप्फुसांच्या आजारामुळे त्यांचे ५३व्या वर्षी निधन झाले.

सिराज आधी आपल्या वडिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गेला. त्यानंतर तेथून घरी गेल्यावर त्याने आपली घरातील कर्तव्य बजावण्यास सुरूवात केली. सिराज आपल्या भाचीसोबत सोबत खेळतानाचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

दरम्यान, सिराजच्या वडिलांनी रिक्षा चालवून सिराजचे क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न साकारले. मागील रणजी हंगामात हैदराबादकडून ४१ बळी घेतल्यामुळे तो प्रकाशझोतात आला. त्यामुळे दोन कोटी ६० लाख रुपयांची बोली लावत त्याला सनरायजर्स हैदराबादने संघात स्थान दिले. सिराजची चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली होती. त्यातही त्याने दमदार कामगिरी केली.