ऋषिकेश बामणे

अवघ्या तीन-चार महिन्यांचा असतानाच आलेले अंपगत्व, घरातील हालाखीची आर्थिक परिस्थिती आणि खेळण्यासाठी करावी लागणारी तारेवरची कसरत यांसारख्या असंख्य आव्हानांवर मात करत विक्रांत केणीने अपंगांच्या क्रिकेटमध्ये उत्तुंग भरारी घेतली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंडमध्ये झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद मिळवून सर्वाचे लक्ष वेधले आहे.

‘‘कारकीर्दीतील अविस्मरणीय असा तो क्षण होता. प्रशिक्षक, निवड समिती आणि खेळाडूंच्या मेहनतीमुळे आम्ही हे यश मिळवू शकलो. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी पाच दिवस अगोदरच आम्ही इंग्लंडला पोहोचून सरावाला सुरुवात केली व त्याचा फायदा आम्हाला संपूर्ण स्पर्धेदरम्यान झाला,’’ अशी प्रतिक्रिया विक्रांतने व्यक्त केली.

३३ वर्षीय विक्रांत तारापूर येथील कांबोडे परिसरात राहतो. त्याला बालपणीच पोलिओ हा आजार झाला होता. त्याचे वडील रवींद्र हे मासेमारीचा व्यवसाय करतात, तर आई मानिनी गृहिणी आहे. त्याशिवाय आठ जणांच्या मोठय़ा कुटुंबामुळे विक्रांतचे बालपण कठीण गेले. नेहमी सामान्य मुलांसोबत क्रिकेट खेळणाऱ्या विक्रांतने कधीच त्याच्या शारीरिक अपंगत्वाचा परिणाम खेळावर होऊ दिला नाही. मोठय़ा भावाला क्रिकेट खेळताना पाहून वयाच्या १३व्या वर्षी विक्रांतने क्रिकेटमध्ये कारकीर्द घडवण्याचे ठरवले. २०१३मध्ये जागतिक शारीरिक तंदुरुस्ती दिनानिमित्त झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याद्वारे विक्रांतने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.

कारकीर्दीतील सुरुवातीच्या काळाविषयी विचारले असता डावखुऱ्या हाताने फलंदाजी व गोलंदाजी करणारा विक्रांत म्हणाला, ‘‘सुरुवातीच्या काळात मला उजव्या हाताला त्रास जाणवायचा. परंतु नंतर मी याकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. माझी इच्छाशक्ती दृढ करून मी त्या हातावर अधिक ताण पडणार नाही, याकडे लक्ष दिले. हळूहळू मला सवय झाली व मी निडरपणे क्रिकेट खेळू लागलो.’’

अंपगत्वामुळे विक्रांतला कोणतीही कंपनी सुरुवातीला कामावर रुजू करण्यास तयार नव्हती. मात्र काही वर्षांपूर्वी डी-डेकोर कंपनीने त्याला क्रिकेटपटू म्हणून व्यावसायिक पातळीवर संधी दिली आहे. आजवरच्या कारकीर्दीत आई-वडील, प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांच्याव्यतिरिक्त यती साकरे, विवेक कदम, रवी पाटील व राजू सुतार यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केल्यामुळेच मी इथवर मजल मारू शकलो, असेही माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला आदर्श मानणाऱ्या विक्रांतने सांगितले. मुंबईतील कांगा लीग आणि विविध क्लबस्तरीय स्पर्धामध्ये खेळणाऱ्या विक्रांतने आगामी वर्षांत अपंगांच्या क्रिकेटला अधिक भरारी मिळवून देण्याचे यश बाळगले आहे.

विक्रांतकडे दडपणाच्या परिस्थितीतही संयम बाळगून अचूक निर्णय घेण्याची क्षमता असल्याचे मला बदलापूर येथील शिबिरात जाणवले व त्याच्या याच गुणांमुळे मी प्रभावित झालो. खेळाडूंकडून कशा प्रकारे योग्य कामगिरी करवून घेता येईल याची त्याला जाणीव आहे. विशेषत: अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने जी खेळी साकारली, त्यामध्ये खडूस मुंबईकर आढळला.

– सुलक्षण कुलकर्णी, भारतीय अपंग संघाचे प्रशिक्षक