अल्पावधीतच यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या विराट कोहलीची गणना जगातील उत्कृष्ट फलंदाजांमध्ये होते. पण, त्याने इंग्लंडमध्ये चांगली खेळी तरच तो महान फलंदाज आहे असे म्हणणे सार्थ ठरेल, असे मत वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू, जलदगती गोलंदाज मायकल होल्डिंग यांनी व्यक्त केले.

कसोटी, एकदिवसीय आणि टी२० अशा तिन्ही प्रकारच्या खेळांमध्ये विराट कोहली त्याच्या दमदार खेळीसाठी ओळखला जातो. किंबहुना या तिन्ही प्रकारच्या खेळांमध्ये विराटने स्वत:ला सिद्ध केले आहे असे अनेकांचेच मत. सध्याच्या घडीलासुद्धा दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाच्या कर्णधारपदी असलेल्या विराटला कर्णधार म्हणून अपयश आले असले तरीही त्याने स्वत:चा फॉर्म मात्र बऱ्यापैकी जपला आहे. सेंच्युरिअन कसोटीच्या पहिल्या इनिंगमध्ये विराटने १५३ धावा करत त्याच्या आणखी एक उल्लेखनीय खेळी खेळली.

पण, इंग्लंडमध्ये मात्र विराट फलंदाजीत फारसा चमकू शकला नाही. २०१४ मध्ये इंग्लंडमध्ये खेळवण्यात आलेल्या शृंखलेमध्येसुद्धा तो फारसा चमकला नाही. त्यावेळी १० इनिंग्समध्ये त्याने १३.४ सरासरीनेच धावा केल्या होत्या. पण, आता मात्र हा दुष्काळ नाहीसा करण्याची संधी विराटच्या हातात आहे. कारण येत्या काळात जो रुटच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या इंग्लंडच्या संघासोबत तब्बल पाच कसोटी सामन्यांची शृंखला खेळण्याची संधी विराटला मिळणार आहे. त्यामुळे या कसोटी मालिकेत त्याने स्वत:ला सिद्ध करावे, असे मत होल्डिंग यांनी मांडले.

वाचा : बचावात्मक क्रिकेट खेळल्यामुळे रोहित शर्मा कसोटीत अपयशी – डीन जोन्स

विराटने इंग्लंडमध्ये त्याच्या खेळावर जास्त मेहनत घ्यावी असा सल्ला त्यांनी दिला. सध्याच्या घडीला आघाडीवर असणाऱ्या तीन क्रिकेट खेळाडूंची नावे मला विचारण्यात आली तेव्हा आपण त्यात विराट कोहलीचे नाव घेतले होते, असे होल्डिंग ‘मुंबई मिरर’शी बोलताना म्हणाले.
इंग्लंडमध्ये विराटच्या खेळाविषयी आशावादी असणाऱ्या होल्डिंग यांनी त्याच्याविषयी वक्तव्य करत म्हटले, ‘तो खूपच चांगला खेळाडू आहे.

विविध खेळपट्टीवर फलंदाजी करुन जवळपास सर्वच ठिकाणी धावांचा डोंगर रचणारे खेळाडू मला आवडतात. तो एक अद्वितीय खेळाडू आहे.’ विराटची प्रशंसा करणाऱ्या होल्डिंग यांनी यावेळी जो रुट आणि स्टीव्ह स्मिथ हे खेळाडू सध्याच्या घडीला आघाडीवर असल्याचे स्पष्ट केले. त्यासोबतच पुन्हा एकदा कसोटी क्रिकेटमध्ये सक्रिय झालेल्या ए बी डीविलिअर्सच्या खेळाकडे लक्ष देणेही तितकेच महत्त्वाचे असेल, असेही त्यांनी सांगितले.