13 December 2017

News Flash

जुन्या पिढीतील क्रिकेटपटू भाऊसाहेब निंबाळकर यांचे निधन

भारतीय क्रिकेटविश्वात ‘विक्रमांचा बादशाह’ म्हणून ओळखले जाणारे कॅप्टन भाऊसाहेब निंबाळकर यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन

क्रीडा प्रतिनिधी कोल्हापूर | Updated: December 12, 2012 2:35 AM

भारतीय क्रिकेटविश्वात ‘विक्रमांचा बादशाह’ म्हणून ओळखले जाणारे कॅप्टन भाऊसाहेब निंबाळकर यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी विख्यात असणारा क्रिकेटपटू हरपल्यामुळे महाराष्ट्राच्या क्रिकेटवर शोककळा पसरली.
भाऊसाहेब निंबाळकर यांच्या घराण्यात क्रिकेटची प्रदीर्घ परंपरा आहे. त्यांच्या कुटुंबातील चार पिढय़ा क्रिकेटमध्ये रमल्या. भाऊसाहेब निंबाळकर यांची प्रदीर्घ कारकीर्द क्रिकेटमध्ये विक्रमांचे डोंगर रचत राहिली. १९३९ ते १९६५ अशी २५ वर्षे ते क्रिकेटचे मैदान गाजवीत राहिले. १९४८-४९साली महाराष्ट्र विरुद्ध काठीयावाड यांच्यात पुण्यात रणजी सामना झाला. तेव्हा महाराष्ट्राकडून खेळताना निंबाळकर यांनी नाबाद ४४३ धावांचा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. उपाहाराला महाराष्ट्रने ४ बाद ८२६ केल्या होत्या. हा सामना काठीयावाड संघाने सोडला नसता तर भाऊसाहेब निंबाळकर यांनी सर डॉन ब्रॅडमन यांचा प्रथमश्रेणी सामन्यातील नाबाद ४५२ धावांचा विक्रम मोडला असता. पण नंतर ब्रॅडमन यांनी निंबाळकर यांना एक पत्र पाठवून त्यांची खेळी ही आपल्या खेळीपेक्षा अधिक चांगली असल्याचे कौतुक केले होते. सध्या जागतिक प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये निंबाळकर यांची ती ऐतिहासिक खेळी चौथ्या स्थानावर आहे.
भाऊसाहेब निंबाळकर यांनी महाराष्ट्र, बडोदा, होळकर, मध्य भारत व रेल्वे अशा संघांकडून रणजी सामन्यात प्रतिनिधित्व केले. ८० सामन्यांमध्ये त्यांनी ५६.७२ धावांची सरासरी राखत ४,८४१ धावा केल्या होत्या. त्यामध्ये १२ शतके व २२ अर्धशतकांचा समावेश होता. निंबाळकर हे उत्तम मध्यमगती गोलंदाजही होते. त्यांनी ४०.२२ धावांची सरासरी राखत ५८ फलंदाजांना बाद केले होते. फलंदाजी व गोलंदाजीबरोबर यष्टीरक्षण करताना १० फलंदाजांना यष्टीचित केले होते. त्यांनी ४७ झेलही पकडले. रणजी सामन्यांमध्ये ते प्रदीर्घ काळ खेळले तरी कसोटी मात्र ते खेळू शकले नाहीत. १९४९ साली राष्ट्रकुल सामन्यात त्यांची निवड झाली होती.
क्रिकेटशी त्यांचे नाते अखेरपर्यंत जोडले गेले होते. पतियाळा येथील राष्ट्रीय क्रिकेट शिबिरास ते प्रशिक्षक म्हणून निवडले गेले होते. त्यांना सी.के.नायडू हा क्रिकेटमधील मानाचा पुरस्कारही प्राप्त झाला होता. कोल्हापूरच्या क्रिकेट जगताला उंचीवर नेण्याचे काम केल्याने त्यांना कोल्हापूर महापालिकेने १९९९ साली ‘कोल्हापूरभूषण’ पुरस्कार दिला होता. सहकार प्रबोधन गुलाबराव पाटील यांच्यासह अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले होते. कोल्हापूरच्या क्रिकेटपटूंनी क्रिकेटमध्ये नाव कमवावे, यासाठी त्यांचे सदोदित प्रयत्न सुरू होते. त्यांचे सुपुत्र सूर्याजी हेसुध्दा महाराष्ट्र व रेल्वे संघाकडून क्रिकेट खेळत होते.
ज्येष्ठ क्रिकेटपटू भाऊसाहेब निंबाळकर यांच्या निधनाचे वृत्त कळताच त्यांच्या निवासस्थानी सर्व स्तरातील नागरिकांनी गर्दी केली होती. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. अंत्ययात्रेत मुख्यमंत्री चव्हाण, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, छत्रपती शाहू महाराज, महापौर जयश्री सोनवणे, आमदार चंद्रदीप नरके, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार पी.एन.पाटील, मालोजीराजेछत्रपती, कोल्हापूर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बाळ पाटणकर, विजय भोसले, माजी अध्यक्ष  ऋतुराज इंगळे आदींचा समावेश होता. पंचगंगा नदीघाटावर अंत्यविधी झाला. त्यांचे पुत्र नेताजी यांनी अग्नी दिला.भाऊसाहेब निंबाळकर यांच्या कौटुंबिक नात्याच्या आठवणींना उजाळा देऊन मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, रणजी क्रिकेटमध्ये विक्रमी कामगिरी करणारा ख्यातनाम क्रिकेटपटू हरपला आहे. त्यांची कामगिरी तरुण पिढीला प्रेरणा देणारी आहे. जीवनात व खेळात सकारात्मक कामगिरी करण्याचा त्यांचा दृष्टिकोन सर्वाना मार्गदर्शक आहे. त्यांच्या निधनाने व्यक्तिगत नुकसान झाल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

First Published on December 12, 2012 2:35 am

Web Title: cricketor bhausaheb nimbalkar expired
टॅग Cricket,Sports