ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक क्रिकेट संस्कृतीत बिग बॅश लीग या स्पर्धेला गेल्या काही वर्षांत महत्वाचं स्थान प्राप्त झालं आहे. टी-२० सामन्यांच्या या स्पर्धेत अनेक दिग्गज खेळाडू सहभागी होतात. मात्र यंदाच्या वर्षात बिग बॅश लीग क्रिकेटमध्ये एक नवा प्रकार रुजू करत आहे. यंदा बिग बॅश लीगमध्ये नाणेफेकीचा प्रकार रद्द करण्यात येणार असून नाण्याऐवजी बॅट उडवली जाणार आहे.

नाणेफेकीदरम्यान कर्णधारांना छापा की काटा याऐवजी सपाट किंवा उंचवटा (Hills or Flat) असा पर्याय निवडायचा आहे. १९ डिसेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. “काही लोकांना हा बदल आवडलेला नाहीये, मात्र बिग बॅश लीग याच नाविन्यपूर्ण गोष्टींसाठी ओळखली जाते. कित्येक जण सामन्यात होणाऱ्या नाणेफेकीकडे गांभीर्याने पाहत असतात? त्यामुळे काळानरुप काही गोष्टी बदलणं गरजेचं असतं.” बिग बॅश लीगचे प्रमुथ किम मॅकोनी यांनी आपलं मत व्यक्त केलं. त्यामुळे बिग बॅश लीगच्या या नवीन पद्धतीला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.