रिअल बेटिसचा १-० असा विजय; ७४ सामन्यांत पहिल्यांदाच माद्रिदची गोलची पाटी कोरी

अँटोनिओ सानब्रियाने भरपाई वेळेत केलेल्या एकमेव गोलमुळे रिअल बेटिस संघाला रिअल माद्रिद संघावर १-० असा विजय मिळवता आला. अव्वल फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने या सामन्याद्वारे ला लिगामध्ये पुनरागमन केले होते. पण या सामन्यात माद्रिदला पराभव सहन करावा लागला. त्याचबरोबर गेल्या ७४ सामन्यांमध्ये माद्रिदवर पहिल्यांदाच गोल न करण्याची नामुष्की ओढवली.

बेटिस संघाकडून पराभूत झाल्यावर माद्रिदचा संघ ८ गुणांसह सातव्या स्थानावर आहे. या स्पर्धेत सध्याच्या घडीला बार्सिलोनाने १५ गुणांसह अव्वल स्थान कायम ठेवले आहे. माद्रिदवर विजय मिळवत बेटिस संघाने गुणतालिकेत सहावे स्थान पटकावले आहे.

पुनरागमन करणाऱ्या रोनाल्डोवर या वेळी साऱ्यांच्या नजरा खिळलेल्या होत्या. पण त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले. बेटिसकडून या वेळी अप्रतिम बचाव पाहायला मिळाला, त्याच्या गोलरक्षकानेही दमदार कामगिरी केली. ९० मिनिटांमध्ये दोन्ही संघ गोलबरोबरीत होते. पण सामन्याच्या ९३व्या मिनिटाला अँटोनिओने हेडरद्वारे गोल करीत संघाला अनपेक्षित विजय मिळवून दिला.

गेल्या वर्षी आम्ही बेटिसविरुद्धचा सामना जिंकलो होतो. पण विजयात सातत्य ठेवण्यात अपयशी ठरलो आणि आता आम्हाला पराभव स्वीकारावा लागला आहे. ही लीग फार काळ चालणार आहे, त्यामुळे पुढे कशी कामगिरी करायची हे आम्हाला पाहावे लागेल. पण सध्याच्या घडीला तरी आम्ही शांत राहायला हवे. कारण यापुढे नक्कीच चांगले दिवस पाहायला मिळतील.  झिनेदिन झिदान, रिअल माद्रिदचे प्रशिक्षक.