युव्हेंटस उपांत्यपूर्व फेरीत; अ‍ॅटलेटिको माद्रिदवर मात

एपी, तुरिन (इटली) : पोर्तुगालचा नामांकित फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने सर्वोत्तम लयीत असल्यास आपण काय किमया दाखवू शकतो, याचा प्रत्यय पुन्हा एकदा फुटबॉलविश्वाला घडवला. मंगळवारी युएफा चॅम्पियन्स फुटबॉल लीगच्या उपउपांत्यपूर्व फेरीत रोनाल्डोच्या हॅट्ट्रिकमुळेच युव्हेंटसने अ‍ॅटलेटिको माद्रिदचा ३-० असा धुव्वा उडवत दिमाखात उपांत्यपूर्व फेरी गाठली.

माद्रिद येथे झालेल्या पहिल्या लढतीत अ‍ॅटलेटिकोने २-० असा विजय मिळवला होता, परंतु दुसऱ्या सामन्यातील ३-० अशा विजयामुळे युव्हेंटसने ३-२ अशा एकूण गोलसंख्येसह उपांत्यपूर्व फेरीतील स्थान पक्के केले.

‘ह’ गटात अव्वल स्थान मिळवणाऱ्या युव्हेंटसने सामन्याच्या सुरुवातीपासूनच चेंडूवर ताबा मिळवला. २७व्या मिनिटाला पावलो डिबेलाच्या पासवर रोनाल्डोने हेडर लगावत पहिला गोल केला. मध्यांतरापर्यंत १-० अशी आघाडी कायम राहिल्यानंतर ४९व्या मिनिटाला लिओनाडरे स्पिनझोलाच्या पासचे रोनाल्डोने पुन्हा गोलमध्ये रूपांतर करत आघाडी २-० अशी वाढवली. त्यानंतर ८६व्या मिनिटाला पेनल्टी लाभल्यामुळे रोनाल्डोने हॅट्ट्रिक

पूर्ण करत वैयक्तिक व संघाचादेखील तिसरा गोल केला. अ‍ॅटलेटिकोचे अ‍ॅन्टोनी ग्रीझमन, दिएगो गॉडिन, जोशुआ जिमिनेझ सपशेल अपयशी ठरले.

८ चॅम्पियन्स लीगच्या इतिहासात रोनाल्डोची ही आठवी हॅट्ट्रिक ठरली. त्याने बार्सिलोनाच्या लिओनेल मेसीशी बरोबरी साधली आहे.

२५ रोनाल्डोने अ‍ॅटलेटिको माद्रिदविरुद्ध सर्व स्पर्धामध्ये मिळून आतापर्यंत २५ गोल केले आहेत.

१ चॅम्पियन्स लीगमध्ये प्रथमच युव्हेंटसने ०-२ अशा पिछाडीनंतर ३-२ अशा एकूण गोलसंख्येच्या बळावर सामना जिंकत उपांत्यपूर्व फेरी गाठली.