लिओनेल मेस्सीपेक्षा मी श्रेष्ठ खेळाडू असल्याची दर्पोक्ती ख्रिस्तियानो रोनाल्डोने केली आहे. स्पॅनिश वृत्तपत्र मार्काला दिलेल्या मुलाखतीत रोनाल्डोने हा दावा केला आहे. एकाच कालखंडातील अव्वल खेळाडूंमध्ये नेहमीच चुरस असते. गोल करण्याची अद्भुत क्षमता असलेला लिओनेल मेस्सी बार्सिलोना क्लब आणि अर्जेटिनासाठी किमयागार आहे. दुसरीकडे रिअल माद्रिद क्लब आणि पोर्तुगालचा तारणहार अशी रोनाल्डोची ख्याती आहे.
गेल्या आठ वर्षांतील माझी कामगिरी अभ्यासली तर श्रेष्ठ कोण याचा फैसला आपोआप करता येईल. माझ्याप्रमाणे किंवा माझ्यापेक्षा जास्त चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूचे नाव सांगा असा खोचक सवालही रोनाल्डोने केला. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी तसेच जेतेपदांची संख्या यांचा दाखला देत असंख्यजण मेस्सीला श्रेष्ठ ठरवतात. पण प्रत्यक्षात मी सर्वोत्तम आहे, असे तो म्हणाला.
विविध स्पर्धामध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीपासून सर्वाधिक किमतीचे ब्रँड-जाहिराती करार पटकावणाऱ्यांच्या पंक्तीत हे दोघे अग्रस्थानी असतात. जागतिक फुटबॉलचे नियंत्रण करणाऱ्या फिफातर्फे देण्यात येणाऱ्या वर्षांतील सवरेत्कृष्ट फुटबॉलपटू पुरस्कारासाठी हे दोघे सातत्याने शर्यतीत असतात. मेस्सीने हा पुरस्कार चारवेळा पटकावला आहे, तर रोनाल्डोने तीनदा या पुरस्कारावर नाव कोरले आहे. प्रतिस्पर्धी कंपूतील चाहत्यांनी मला दूषणे दिली तर माझ्यावर नकारात्मक परिणाम होत नाही उलट चांगल्या कामगिरीसाठी प्रेरणा मिळते, असा टोलाही रोनाल्डोने लगावला. तो म्हणाला, ‘‘फुटबॉल माझे आयुष्य आहे, या खेळावर माझे निस्सीम प्रेम आहे आमि त्यासाठी खडतर परिश्रमाचा मार्ग अवलंबला आहे. ’’