बलात्काराचे प्रकरण फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोला चांगलेच भोवणार असल्याचे दिसत आहे. स्कॉटलँड आणि पोलंडविरूद्ध होणाऱ्या दोन आंतरराष्ट्रीय सामन्यातून पोर्तुगालने त्यांचा स्टार खेळाडू रोनाल्डोला वगळले आहे. रियल माद्रिदच्या या माजी खेळाडूला सप्टेंबरमध्येही आंतरराष्ट्रीय सामन्यातून विश्रांती देण्यात आली होती. याबाबत पोर्तुगालचे प्रशिक्षक फर्नांदो सांतोस यांनी भविष्यात कोणीही रोनाल्डोला राष्ट्रीय संघात योगदान देण्यापासून रोखू शकत नसल्याचे म्हटले आहे.

सप्टेंबरमध्ये क्रोएिशया आणि इटलीविरोधातील आंतरराष्ट्रीय सामन्यातूनही रोनाल्डोला वगळण्यात आले होते. त्यावेळी सांतोस यांनी रियल माद्रिदच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी रोनाल्डोला वेळ दिल्याचे म्हटले होते. विशेष म्हणजे, रोनाल्डो एका बलात्काराच्या प्रकरणात अडकला आहे. अशात स्कॉटलँड आणि पोलंडविरोधातील सामन्यात त्याचा समावेश करण्यात न आल्याने बलात्कार प्रकरण महागात पडणार असल्याचे दिसते.

दरम्यान, लास वेगासच्या हॉटेलमध्ये एका अमेरिकन मॉडेलवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप रोनाल्डोने नाकारला आहे. तसेच लैंगिक अत्याचार हा घृणास्पद प्रकार असल्याचे रोनाल्डोने त्याच्या ट्विटर खात्यावर म्हटले आहे.

पोर्तुगीज आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये त्याने हे ट्वीट केले आहे. मी ज्या तत्त्वांवर विश्वास ठेवतो, त्यात लैंगिक अत्याचारांना अजिबात थारा नाही. हा एक घृणास्पद प्रकार असल्याने मी हे आरोप ठामपणे फेटाळत असल्याचे रोनाल्डोने सांगितले. तसेच या संपूर्ण प्रकरणात माझ्या नावाचा वापर करून काही जण प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावादेखील त्याने केला आहे.

अमेरिकेत १३ जून २००९ च्या रात्री एका हॉटेलमध्ये रोनाल्डोने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप अमेरिकेची ३४ वर्षीय मॉडेल मेओरगा हिने केला आहे. तसेच या घटनेनंतर मी स्थानिक पोलिसात दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासह तोंड बंद ठेवण्यासाठी मला पावणेचार लाख अमेरिकन डॉलर देऊन दबाव टाकण्यात आल्याचा आरोप मेओरगा हिने केला होता.