News Flash

रोनाल्डोच सर्वोत्तम

गोल करण्याच्या अद्भुत आणि सातत्यपूर्ण क्षमतेच्या जोरावर पोर्तुगाल आणि रिअल माद्रिदच्या विजयात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या ख्रिस्तियानो

| January 14, 2015 01:47 am

गोल करण्याच्या अद्भुत आणि सातत्यपूर्ण क्षमतेच्या जोरावर पोर्तुगाल आणि रिअल माद्रिदच्या विजयात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने सर्वोत्तम फुटबॉलपटूसाठीच्या ‘बॅलॉन डी ऑर’ पुरस्कारावर नाव कोरले.
रिअल माद्रिदला दहाव्यांदा चॅम्पियन्स लीग स्पर्धेचे जेतेपद मिळवून देण्यात रोनाल्डोने १७ गोलसह निर्णायक भूमिका बजावली होती. बार्सिलोना आणि अर्जेटिनाचा किमयागार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला मागे टाकत रोनाल्डोने कारकीर्दीत सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा या पुरस्काराचा मानकरी होण्याचा मान मिळवला. २००८ मध्ये रोनाल्डोने पहिल्यांदा या पुरस्कारावर नाव कोरले. मात्र त्यानंतर सलग चार वर्षे मेस्सीने या पुरस्कारावर वर्चस्व गाजवले. मात्र त्यानंतरच्या दोन्ही वर्षी रोनाल्डोने मेस्सीला पिछाडीवर टाकत बाजी मारली. यंदा पुरस्कारासाठी शर्यतीत असणाऱ्या जर्मनीचा गोलरक्षक मॅन्युअल न्यूअरला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
रिअल माद्रिद संघातील रोनाल्डोचा सहकारी जेम्स रॉड्रिगेझला वर्षांतील सवरेत्कृष्ट गोलसाठीच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. ब्राझीलमधील विश्वचषकात उरुग्वेविरुद्ध अफलातून गोल करणाऱ्या रॉड्रिगेझने कोलंबियाला उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारण्यात निणार्यक भूमिका बजावली होती. हा माझ्यासाठी आणि कोलंबियासाठी महत्त्वाचा गोल होता. आनंद आणि समाधान मिळवून देणारा असा तो गोल होता, असे रॉड्रिगेझने बोलताना सांगितले.
विश्वचषक विजेत्या जर्मन संघाचे मार्गदर्शक जोअ‍ॅकिम लो यांना सवरेत्कृष्ट प्रशिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘‘हा पुरस्कार माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. विश्वविजेतेपद मिळवून संघाचे मार्गदर्शनासाठी हा पुरस्कार असल्याने त्याला अनोखे महत्त्व आहे. विश्वविजेतेपद म्हणजे असंख्य वर्षांच्या तपश्चर्येचे फळ आहे,’’ असे लो यांनी सांगितले. इटलीचे प्रशिक्षक कालरे अ‍ॅनकलोटी आणि अ‍ॅटलेटिको माद्रिदचे प्रशिक्षक दिएगो सिमोन यांना मागे टाकत लो यांनी पुरस्कारावर कब्जा केला. सवरेत्कृष्ट महिला खेळाडू पुरस्कारासाठी जर्मनीच्या नादिन केसलरची निवड झाली.
पुरस्कार वितरणावेळी रोनाल्डोला अश्रू अनावर झाले. या समारंभाला रोनाल्डोचा मुलगा आणि आई उपस्थित होते. पोर्तुगाल आणि रिअल माद्रिद संघातील सहकाऱ्यांचे त्याने आभार मानले. सदैव पाठीशी उभे राहणाऱ्या कुटुंबीयांच्या पाठिंब्याबद्दल त्याने कृतज्ञता व्यक्त केली.
रोनाल्डोला पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पोर्तुगालमध्ये जल्लोषाला उधाण आले. सातत्याने गोल करण्याची क्षमता, सहकाऱ्यांसाठी गोलची संधी निर्माण करून देण्याची हातोटी, चिवट तंदुरुस्ती आणि खेळाप्रति असलेल्या निष्ठेचे हा पुरस्कार प्रतीक आहे. ही सर्व गुणवैशिष्टय़े रोनाल्डोने नेहमीच जोपासली आहेत. त्याने तिसऱ्यांदा या पुरस्कारावर नाव कोरणे ही त्याच्या अलौकिक प्रतिभेची साक्ष आहे, अशा शब्दांत पोर्तुगालचे अध्यक्ष अनिबाल कॅव्हाको सिल्व्हा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

फिफा प्रो संघ
वर्षभरात दिमाखदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा प्रो संघ फिफाने जाहीर केला. संघ- मॅन्युअल न्यूअर, फिलीप लॅम, थिआगो सिल्व्हा, डेव्हिड ल्युइझ, सर्जिओ रामोस, अँजेल डि मारिआ, टोनी क्रुस, आंद्रेस इनेइस्टा, ख्रिस्तियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी, आयेन रॉबेन.

तिसऱ्यांदा हा पुरस्कार पटकावेन असे कधीही वाटले नव्हते. मला फुटबॉल विश्वातील महान खेळाडू व्हायचे आहे आणि त्यासाठी अथक मेहनतीची आवश्यकता आहे. माझ्या यशात कुटुंबीयांचा वाटा सिंहाचा आहे. २०१४ वर्ष माझ्यासाठी संस्मरणीय ठरले आणि या वर्षांतील प्रदर्शनासाठी ‘बॅलॉन डी ऑर’सारखा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळवणे अविश्वसनीय आहे.
– ख्रिस्तियानो रोनाल्डो

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2015 1:47 am

Web Title: cristiano ronaldo named world best player
टॅग : Cristiano Ronaldo
Next Stories
1 मेस्सीचा ‘यू टर्न’बार्सिलोना सोडण्याचे संकेत
2 पराभवानंतर भारताला कमी लेखू नका
3 राष्ट्रीय बॉक्सिंग अजिंक्पद स्पर्धा : सुमीत संगवान अंतिम फेरीत
Just Now!
X