युक्रेनकडून गतविजेत्या पोर्तुगालचा पराभव

पॅरिस : विश्वातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूंपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने नोंदवलेल्या कारकीर्दीतील ७००व्या गोलनंतरही पोर्तुगालला सोमवारी रात्री युरो २०२० पात्रता फुटबॉल स्पर्धेत पराभवाला सामोरे जावे लागले. युक्रेनने गतविजेत्यांचा २-१ असा पराभव करून युरो चषकाची पात्रता मिळवली.

युक्रेन येथील एनएससी ऑलिम्पिक स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात रोमान यारोमचेकने सहाव्या मिनिटाला युक्रेनसाठी गोल करून संघाचे खाते उघडले. तर २७व्या मिनिटाला आंद्रे यारमोलेन्कोने दुसरा गोल नोंदवून युक्रेनला सामन्यात २-० अशी आघाडी मिळवून दिली.

मात्र ७२व्या मिनिटाला पेनल्टी मिळाल्यामुळे रोनाल्डोने पोर्तुगालसाठी पहिला गोल केला; परंतु उर्वरित वेळेत त्यांना गोल करण्यात अपयश आल्याने युक्रेनच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.

इंग्लंडच्या विजयाला गालबोट

सोफिया : युरो २०२० पात्रता फुटबॉल स्पर्धेत सोमवारी रात्री इंग्लंडने बल्गेरियाचा ६-० असा धुव्वा उडवला; परंतु व्हॅसिल लेव्हस्की स्टेडियममधील उपस्थित चाहत्यांनी केलेल्या हुल्लडबाजी आणि वर्णद्वेषामुळे या सामन्याला गालबोट लागले. इंग्लंडसाठी रहीम स्टर्लिग (४५+४ आणि ६९वे मिनिट), रॉस बार्कली (२० आणि ३२) यांनी प्रत्येकी दोन गोल केले, तर मार्कस रशफोर्ड (७) आणि हॅरी केन (८५) यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवून इंग्लंडच्या विजयात मोलाचे योगदान दिले; परंतु चाहत्यांनी घातलेल्या धुमाकुळामुळे दोन वेळा हा सामना थांबवण्यात आला. इंग्लंडच्या संघातील कृष्णवर्णीय खेळाडूंच्या विरोधात चाहते घोषणा करत होते.

फ्रान्सला तुर्कस्तानने बरोबरीत रोखले

पॅरिस : कान अह्य़ानने केलेल्या निर्णायक गोलच्या बळावर तुर्कस्तानने विश्वविजेत्या फ्रान्सला १-१ असे बरोबरीत रोखले. त्यामुळे युरो चषकाची पात्रता मिळवण्यासाठी फ्रान्सला आणखी काही सामने प्रतीक्षा करावी लागणार आहे. स्टेड दी फ्रान्स स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मध्यंतरापूर्वी कोणालाही गोल करता आला नाही. अखेरीस अनुभवी ऑलिव्हर जिरुडने ७६व्या मिनिटाला फ्रान्ससाठी पहिला गोल केला. अ‍ॅन्टोइन ग्रीझमनने गोलजाळ्याच्या डाव्या दिशेने दिलेल्या पासचे जिरुडने गोलमध्ये रूपांतर केले. मात्र पाच मिनिटांनंतरच अह्य़ानने अप्रतिम गोल नोंदवून तुर्कीला सामन्यात १-१ अशी बरोबरी साधून दिली. गोल केल्यानंतर अह्य़ानने सैन्यांना सलामी देण्याच्या शैलीत आनंद साजरा केला.