एपी, मिलान : रेयाल माद्रिदकडून युव्हेंट्सकडे आलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोला मागील तीन सामन्यांत गोल होत नसल्याचे दडपण जाणवत होते. मात्र हा गोलदुष्काळ संपवताना रविवारी रोनाल्डोने सीरी-ए चषक फुटबॉल स्पर्धेत दोन गोल झळकावले. त्यामुळे युव्हेंट्सला ससूओलो संघाविरुद्ध २-१ असा दमदार विजय मिळवता आला.

युव्हेंट्स संघ आता व्हॅलेन्सियाला रवाना झाला असून, बुधवारी चॅम्पियन्स लीग फुटबॉलमध्ये युव्हेंट्सचा व्हॅलेन्सिया क्लबशी सामना होणार आहे. त्या दृष्टीने रोनाल्डोची कामगिरी ही संघाचा आत्मविश्वास वाढवणारी आहे.

रोनाल्डोने ५०व्या आणि ६५व्या मिनिटाला गोल करीत युव्हेंट्सला २-० अशी आघाडी मिळवून दिली. ससूओलो संघाला युव्हेंट्सच्या बचाव फळीने चांगलेच नियंत्रणात ठेवले. मात्र भरपाई वेळेत ९१व्या मिनिटाला खौमा बाबाकारने गोल करीत ससूओलो संघाचे खाते उघडले.

युव्हेंट्सने मागील सात हंगामांमध्ये सीरी-ए विजेतेपद पटकावले आहे. याशिवाय मागील चार हंगामांमध्ये इटालियन चषकावर नाव कोरले आहे. मात्र युरोपियन स्तरावर हे वर्चस्व राखण्यात त्यांना अपयश आले आहे. १९९६नंतर युव्हेंट्सला चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद पटकावता आलेले नाही. मात्र मागील चार वर्षांत दोनदा उपविजेतेपदापर्यंत मजल मारली आहे.