ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि गॅरेथ बॅलेसारखे नावाजलेले फुटबॉलपटू आणि त्यांना टोनी क्रुस व जेम्स रॉड्रिगेझ या विश्वचषकातील नायकांच्या लाभलेल्या सुरेख साथीच्या जोरावर रिअल माद्रिद संघाने सुपर चषकाचे अजिंक्यपद पटकावले. माद्रिदने सेव्हिला संघावर २-० असा सहज विजय मिळवीत जेतेपदाला गवसणी घातली.
क्रुस आणि रॉड्रिगेझ यांनी या सामन्यात पदार्पण केले, तर बॅलेने पुनरागमन केले. पण या सामन्यात भाव खाऊन गेला तो पोर्तुगालचा कर्णधार रोनाल्डो. सामन्याच्या ३०व्या मिनिटाला बॅलेच्या साहाय्याच्या जोरावर रोनाल्डोने अप्रतिम गोल करीत संघाच्या विजयाचा दमदार पाया रचला आणि त्यानंतर मध्यंतरानंतर दुसरा गोल लगावत माद्रिदने मोसमातील पहिला चषक पटकावला. २००२ सालानंतर माद्रिदला सुपर चषक जिंकता आला नव्हता, तब्बल १२ वर्षांनंतर माद्रिदने सुपर चषक जिंकण्याची किमया साधली.
क्रुस आणि रॉड्रिगेझ यांना पदार्पणाची संधी देताना प्रशिक्षक कालरे अन्सेलोट्टी यांनी ४-३-३ या व्यूहरचनेनुसार खेळ केला आणि त्यामध्ये त्यांना यश मिळाले. रॉड्रिगेझला संघात घेताना माद्रिदच्या संघाने ८० दशलक्ष युरो मोजले होते, तर माद्रिदने एकूण आक्रमणपटूंसाठी ३१० दशलक्ष युरो मोजले आहेत.

हा सामना आमच्यासाठी सोपा नव्हता, पण आम्ही चांगला खेळ करीत गोल करण्याच्या संधीचे सोने केले. क्रुस आणि रॉड्रिगेझ हे दोन्ही खेळाडू आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. या दोघांनीही दमदार खेळ केला आणि संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
– ख्रि्रस्तियानो रोनाल्डो, रिअल माद्रिदचा खेळाडू