युव्हेंटसला हरवून रेयाल माद्रिद उपांत्य फेरीत

रेयाल माद्रिदवर चॅम्पियन्स लीग फुटबॉलमधील आव्हान संपुष्टात येण्याची नामुष्की ओढवणार होती. मात्र भरपाई वेळेत ख्रिस्तियानो रोनाल्डोने साकारलेल्या गोलमुळे त्यांना नाटय़मयरीत्या तारले. अखेरच्या क्षणापर्यंत रंगतदार ठरलेल्या या उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यात युव्हेंटसने ३-१ असा विजय मिळवला. मात्र मागील आठवडय़ात पहिल्या टप्प्यातील सामन्यात रेयालने ३-० अशा फरकाने युव्हेंटसचा धुव्वा उडवला होता. त्यामुळेच एकंदर ४-३ अशा फरकाने रेयालने उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले.

मारियो मांडझुकिकने पहिल्या सत्रात हेडरद्वारे दोन गोल साकारून युव्हेंटसचे स्वप्न जिवंत राखले. मग दुसऱ्या सत्रात ६०व्या मिनिटाला ब्लायसी मॅटय़ुडीने गोल साकारत युव्हेंटसची आघाडी वाढवली. दुसऱ्या टप्प्यातील ही लढत अतिरिक्त वेळेपर्यंत वाढणार अशी चिन्हे दिसत होती. मात्र भरपाई वेळेत इंग्लिश सामनाधिकारी मायकेल ऑलिव्हरने रेयालला पेनल्टी बहाल केली. सामन्याच्या या ९७व्या मिनिटाला १२ यार्डावरून रोनाल्डोने कोणतीही चूक न करता अफलातून गोल साकारला आणि माद्रिदवासीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. गियानलुइगी बफॉन आपल्या कारकीर्दीतील १२५व्या आणि निवृत्त होण्यापूर्वी अखेरच्या चॅम्पियन्स लीग सामन्यात खेळत होता. मात्र ४० वर्षीय बफॉनला भरपाई वेळेतील तिसऱ्या मिनिटाला लाल कार्ड दाखवण्यात आले.

बायर्न उपांत्य फेरीत

सेव्हियाने दुसऱ्या टप्प्यातील लढतीत गोलशून्य बरोबरीत रोखूनही जप हेन्कीसच्या मार्गदर्शनाखाली बायर्न म्युनिच संघाने चॅम्पियन्स लीग फुटबॉलची उपांत्य फेरी गाठली. बायर्नने नऊ हंगामांपैकी सातव्यांदा उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे. स्पेनमध्ये पहिल्या टप्प्यातील लढतीत बायर्नने २-१ असा विजय मिळवला होता. याच विजयामुळे त्यांना आगेकूच करता आली.