रिअल माद्रीद फुटबॉल क्लबचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने आपण निवृत्त होईपर्यंत रिअल माद्रीद संघाकडून खेळत राहण्याची इच्छा व्यक्त केली. रिअल माद्रीद संघाकडून खेळताना आपण खूष असून, रिअल माद्रीद क्लब सोडण्याचा आपला कोणताही हेतू नसल्याचे रोनाल्डोने आपल्या वक्तव्यातून सुचित केले. पोर्तुगालचा ३१ वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो हा रिअल माद्रीदकडून खेळत असून या क्लबकडे मागील वर्षाच्या ला लीगा स्पर्धेचे जेतेपद आहे. मात्र, या लीगमध्ये रोनाल्डोला खेळता आले नव्हते.

फोटो: रोनाल्डोच्या या आकर्षक हेअरस्टाईल्स तुम्ही पाहिल्यात का?

रोनाल्डोला यंदाचा युरोपियन फुटबॉल महासंघातर्फे दिला जाणारा सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार बहाल करण्यात आला. त्यावेळी तो म्हणाला की, मी सध्या जगातील सर्वोत्तम क्लबकडून (रिअल माद्रीद) खेळत आहे. यापुढेही याच क्लबकडून खेळण्याची संधी मिळत राहो आणि याच क्लबमधून वयाच्या ४१ व्या वर्षी आपली निवृत्ती व्हावी, असे रोनाल्डो म्हणाला. यंदाचे वर्ष माझ्यासाठी क्लबस्तरीय आणि राष्ट्रीय अशा एकूण सर्वच कामगिरीसाठी अविस्मरणीय ठरणारे आहे. यापुढेही रिअल माद्रीदकडूनच खेळण्याची आपली इच्छा असल्याचेही तो पुढे म्हणाला.

रिअल माद्रीदचे प्रशिक्षक फ्लोरेंटिनो पेरेझ यांनीही रोनाल्डोच्या कामगिरीचे कौतुक केले. निवृत्ती स्विकारतेवेळी आपण रिअल माद्रीद संघाचाच खेळाडू  असावे, अशी रोनाल्डोची इच्छा आहे आणि आमचीही तीच इच्छा आहे. सर्वजण रोनाल्डोच्या रिअल माद्रीदसोबतच्या कराराबाबत चर्चा करत असले तरी सध्या तो संघात आहे याचा आनंद आम्ही उपभोगत आहोत. त्याचे नेतृत्त्व यापुढील काळातही कायम राहो हीच आमची इच्छा आहे, असेही ते पुढे म्हणाले.