News Flash

जपानसाठी ऑलिम्पिक  आत्मघातकी!

आगामी टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन म्हणजे आत्महत्येची मोहीमच ठरेल.

जपानमधील अब्जाधीश उद्योजक मिकिटानी यांची टीका

आगामी टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन म्हणजे आत्महत्येची मोहीमच ठरेल. त्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करायला हवी, अशी टीका जपानमधील अब्जाधीश उद्योजक आणि राकुटेन समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरोशी मिकिटानी यांनी केली आहे.

ऑलिम्पिकचे आयोजन यशस्वीपणे केले जाईल, असा पुनरुच्चार जपानचे पंतप्रधान योशिहिडे सुगा यांनी केल्यानंतर मिकिटानी यांनी ही टीका केली आहे. ‘‘जनतेचे लसीकरण करण्यासाठी जपान सरकारने बराच विलंब लावला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत आंतरराष्ट्रीय स्पर्धाचे आयोजन करणे धोकादायक आहे. कदाचित ही आत्महत्याच ठरेल,’’ असेही मिकिटानी यांनी सांगितले.

टोक्यो ऑलिम्पिकला अवघे दोन महिने शिल्लक असतानाच जपानमधील अनेक शहरांमध्ये आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे. जपानमधील शहरी भागांमध्ये करोनारुग्णांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना राबवल्या जात आहे, असे पंतप्रधान सुगा यांचे म्हणणे आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव जपानमध्येही दिसून येत आहे. करोनाच्या नव्या अवतारामुळे जपानमधील लोकांच्या जीवितेला अधिक धोका असल्याचे दिसून आले आहे. तसेच जपानमधील फक्त ३.२ टक्के लोकांना लशीची पहिली मात्रा मिळाली आहे. ब्रिटन (५४.१ टक्के) आणि अमेरिकेपेक्षा (४६.८ टक्के) हे प्रमाण खूपच कमी आहे.

खेळाडूंच्या लसीकरणावरून जनता नाखूश

ऑलिम्पिकआधी सर्व खेळाडूंचे लसीकरण करण्यात येणार असल्यामुळे जपानमधील जनता नाखूश असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर ऑलिम्पिकसाठी हजारोंच्या संख्येने खेळाडू आणि पदाधिकारी येणार असल्याने लोकांचे आयुष्य धोक्यात येईल, अशीही चिंता जपानमधील जनतेला लागली आहे. ऑलिम्पिकसाठी येणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना मर्यादित प्रवेश देण्यात येणार असल्याचे सुगा यांनी म्हटले आहे. मात्र करोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना थेट मायदेशी पाठवण्यात येईल, असेही सुगा यांनी स्पष्ट केले.

टोक्यो पॅरालिम्पिकला १०० दिवस शिल्लक

सध्या जपानमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेविरोधी वातावरण निर्माण होत असतानाच टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेला अवघे १०० दिवस शिल्लक राहिले आहे. पॅरालिम्पिक स्पर्धाना २४ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. ‘‘पॅरालिम्पिकचे चांगले आयोजन, हेच टोक्यो ऑलिम्पिकच्या यशाचे रहस्य म्हणता येईल,’’ असे टोक्यो संयोजन समितीच्या अध्यक्षा सेईको हशिमोटो यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2021 1:05 am

Web Title: criticism japanese billionaire entrepreneur mikitani ssh 93
Next Stories
1 रेयाल माद्रिदला झिदानची सोडचिठ्ठी?
2 दडपणाखाली खेळ उंचावण्याची प्रणतीमध्ये क्षमता – दीपा
3 स्पर्धेदरम्यान मनूची ‘बीए’ची परीक्षा
Just Now!
X