विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीतील ‘सुपर-ओव्हर’मधील थरारही टाय अवस्थेत सुटला तर सामन्यात सर्वाधिक चौकार लगावणारा संघ विजेता ठरतो, या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या निर्णयावर आजी-माजी खेळाडूंनी टीकास्त्र सोडले आहे.

रविवारी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात ‘सुपर-ओव्हर’मध्येही टाय झाल्यानंतर इंग्लंडने सर्वाधिक चौकार-षटकारांची आतषबाजी केल्यामुळे त्यांना विजयी घोषित करण्यात आले. मात्र या निर्णयामुळे न्यूझीलंडचे विश्वचषक उंचावण्याचे स्वप्न अधुरे राहिले. त्यामुळे जगभरातून या निर्णयावर हास्यास्पद आणि टीकात्मक प्रतिक्रिया येत आहेत.

न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडसमोर २४२ धावांचे आव्हान ठेवले होते. पण इंग्लंडला ५० षटकांत २४१ धावा करता आल्याने सामना टाय झाला. ‘सुपर-ओव्हर’मध्ये जोस बटलर आणि बेन स्टोक्स यांनी १५ धावा काढल्या. १६ धावांचे उद्दिष्ट गाठताना न्यूझीलंडलाही १५ धावांवरच समाधान मानावे लागले. त्यामुळे सामन्याचा विजेता सर्वाधिक चौकार-षटकारांच्या नियमानुसार ठरवण्यात आला. इंग्लंडने संपूर्ण सामन्यात २२ चौकार आणि २ षटकारांची आतषबाजी केली तर न्यूझीलंडला १४ चौकार आणि २ षटकार लगावता आले. न्यूझीलंडपेक्षा ८ चौकार अधिक लगावल्यामुळे आयसीसीच्या नियमांप्रमाणे इंग्लंड पहिल्यांदा विश्वविजेता ठरला.

क्रिकेटमधील काही नियमांबाबत गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे.

रोहित शर्मा, भारताचा सलामीवीर

विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा निकाल सर्वाधिक चौकारांच्या नियमानुसार ठरवण्यात यावा, ही गोष्ट मला पचनी पडली नाही. आयसीसीचा हा नियम हास्यास्पद आहे. हा सामना टाय अवस्थेतच ठेवायला हवा होता. चित्तथरारक खेळ करणाऱ्या न्यूझीलंड आणि इंग्लंड या दोन्ही संघांचे अभिनंदन

गौतम गंभीर, भारताचा माजी सलामीवीर

या निर्णयाशी मी सहमत नाही. पण नियम हे अखेरीस नियम असतात. त्यामुळे विश्वचषक जिंकल्याबद्दल इंग्लंडचे अभिनंदन. अखेपर्यंत इंग्लंडला कडवी झुंज देणाऱ्या न्यूझीलंडला माझा पाठिंबा आहे. एक अविस्मरणीय सामन्याची अनुभूती घेता आली.

– युवराज सिंग, भारताचा माजी खेळाडू.

आयसीसीने हे एक चांगले काम केले. आयसीसी तुम्ही एक चेष्टेचा विषय बनला आहात.

– स्कॉट स्टायरिस, न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू खेळाडू

इंग्लंडला विश्वविजेता ठरवणारा आयसीसीचा हा नियम कल्पनेपलीकडचा आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंडला संयुक्त विजेते घोषित केले असते आणि विश्वचषक विभागून देण्यात आला असता, तर योग्य झाले असते. विजेतेपदाचा दावेदार नसतानाही न्यूझीलंडने अप्रतिम खेळाचे प्रदर्शन केले. इंग्लंड हा सुरुवातीपासूनच विश्वचषकाच्या शर्यतीत होता. त्यामुळे आयसीसी विचार करा.. गांभीर्याने विचार करा.

– बिशन सिंग बेदी, भारताचे माजी फिरकीपटू

क्रिकेट हा खेळ धावा आणि बळी यांवरच आधारित आहे. जेव्हा धावा समान होतील, त्यावेळी कोणत्या संघाने सर्वाधिक बळी गमावले आहेत, यावर सामन्याचा निकाल द्यायला हवा. पण आयसीसीचा हा नियम दुर्दैवी आहे.

– कायले मिल्स, न्यूझीलंडचा माजी खेळाडू

न्यूझीलंडच्या प्रसारमाध्यमांचीही आगपाखड

वेलिंग्टन : न्यूझीलंडचे पहिलेवहिले विश्वविजयाचे स्वप्न आयसीसीच्या निर्णयामुळे हुकल्यामुळे न्यूझीलंडमधील प्रसारमाध्यमांनी आगपाखड केली आहे. ‘‘विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचे शिल्पकार हे २२ जण आहेत, कुणीही जिंकले नाही तर क्रिकेटचा विजय झाला,’’ असे मथळे न्यूझीलंडच्या प्रसारमाध्यमांनी दिले आहेत. ‘‘चौकार मोजण्याच्या नियमांनी न्यूझीलंडचा घात केला,’’ असे शीर्षक स्टफडॉटकोडॉटएनझेने दिले आहे. ‘‘इंग्लंडला ओव्हरथ्रोसाठी सहाऐवजी पाच धावा द्यायला हव्या होत्या,’’ असा सवाल एका वृत्तपत्राने केला आहे.

इंग्लंड संघाचे राणीकडून कौतुक!

न्यूझीलंडविरुद्ध अप्रतिम कामगिरीचे प्रदर्शन करून विश्वचषकावर नाव कोरणाऱ्या इंग्लंड संघाचे इंग्लंडच्या राणीने कौतुक केले आहे. ‘‘प्रिन्स फिलिप आणि मी इंग्लंडच्या संघाला शुभेच्छा देऊ इच्छिते. त्याचबरोबर संपूर्ण स्पर्धेत आणि अंतिम सामन्यात कडवी झुंज देणाऱ्या न्यूझीलंड संघाचे विश्वविजेतेपदाचे स्वप्न साकार होऊ शकले नाही. त्यांच्यासाठी दु:ख होत आहे,’’ असे राणीने शुभेच्छापर संदेशात म्हटले आहे.