१९ डिसेंबर, २०१६.. भारतीय क्रिकेटमधील ऐतिहासिक दिवस.. चेपॉकच्या खेळपट्टीवर भारताने इंग्लंडविरुद्ध ७ बाद ७५९ असे धावसंख्येचे शीखर उभे करीत एक डाव आणि ७५ धावांनी विजय मिळवला.. करुण नायरच्या नाबाद ३०३ धावांच्या संस्मरणीय खेळीनेही सुवर्णाध्याय लिहिला.. विराट कोहली त्यावेळी कर्णधार होता.

१९ डिसेंबर, २०२०.. बरोब्बर चार वर्षांनी भारतीय संघाच्या नावे नाचक्कीचा नीचांक नोंदला गेला.. अ‍ॅडलेडवर हा संघ ऑस्ट्रेलियाच्या माऱ्यापुढे फक्त ३६ धावांत माघारी परतला.. अडीच दिवसांत पहिली कसोटी भारताने आठ गडय़ांनी गमावली.. कोहलीच यावेळीही कर्णधार आहे.

शनिवार सकाळ टीव्हीवर भारतीय क्रिकेटपटूंच्या  ‘देमार’ कामगिरीने साजरी करण्याची अपेक्षा असलेल्या क्रीडारसिकांना  ऑस्ट्रेलियात भारतीय संघाचा भीषण पराभव पाहावा लागला.

त्यामुळे खट्टू झालेल्या क्रिकेटवेडय़ांनी समाजमाध्यमांतून भारतीय संघाला शब्दांचे फटकारे मारले. यात माजी क्रिकेटपटूही होते. ४, ९, २, ०, ४, ०, ८, ४, ०, ४ आणि १ हा ‘ओटीपी’ क्रमांक भारतीय संघ जितक्या लवकर विसरेल, तितके बरे होईल, असे माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग म्हणाला.

‘बळी’दानावर चर्चा.. 

या मानहानीकारक पराभवानंतर स्वाभाविकपणे समाजमाध्यमांवर त्याचे तीव्र पडसाद उमटले. आपला संघ नक्की आपल्या देशासाठी खेळतोय की ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देण्यासाठी, अशा आशयाच्या मजकुराचा फेसबुकवर पूर आला होता. तर ट्विटरवर प्रत्येक खेळाडूच्या ‘बळी’दानावर जोरदार टीका होत होती.

झाले काय?

पहिल्या डावात ५३ धावांची आघाडी घेत दुसऱ्या दिवशी भारताने प्रकाशझोतामधील पहिल्या कसोटीतील आशा उंचावल्या होत्या. पण तिसऱ्या दिवशी जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्सच्या तेजतर्रार वेगवान माऱ्यापुढे भारतीय फलंदाजांनी हाराकिरी पत्करली. कसोटी क्रिकेटमधील पाचव्या क्रमांकाची नीचांकी धावसंख्या भारताकडून नोंदली गेली.