अतिरिक्त वेळेत रिकाडरे क्युरेस्माचा निर्णायक गोल; क्रोएशियाचा ०-१ असा पराभव

पोलंड आणि स्वित्र्झलड यांच्यातील पेनल्टी शूटआऊटचा थराराचा ज्वर क्षमण्याआधीच दर्दी फुटबॉलप्रेमींना आणखी एका रोमहर्षक लढतीच्या मेजवानीचा आस्वाद घेता आला. शनिवारी मध्यरात्री झालेल्या लढतीत ११६व्या मिनिटापर्यंत गोलशून्य बरोबरीवर असलेला सामना एका क्षणात पोर्तुगालच्या बाजूने झुकला. पेनल्टी क्षेत्राच्या बाहेरून नॅनीने दिलेला दीर्घ पास ख्रिस्तियानो रोनाल्डोने अचूक हेरून गोलजाळीच्या दिशेने भिरकावला, परंतु गोलरक्षक डॅनिजेल सुबासिकच्या हाताला लागून चेंडूची दिशा बदलली. डाव्या बाजूने गोलजाळीनजीक आलेल्या रिकाडरे क्युरेस्माने चेंडूची दिशा अचूक हेरून हेडरद्वारे गोल केला आणि पोर्तुगालच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. या गोलनंतर क्रोएशियाच्या खेळाडूंनी शरणागती पत्करली. त्यांच्या डोळ्यांत तरळत असलेले अश्रू या पराभवाची वेदना सांगत होते. अखेरच्या क्षणात गोल करण्याचा आटापिटा करूनही त्यांना यश आले नाही. उर्वरित चार मिनिटांच्या खेळात पोर्तुगालने बचावात्मक खेळ करताना उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित केला.

‘ड’ गटातून अव्वल स्थानासह उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणारा क्रोएशिया आणि ‘फ’ गटातून तिसऱ्या स्थानावरून लडखडत आगेकूच करणारा पोर्तुगाल यांच्यात क्रोएशियाला विजय मिळेल असे वाटत होते. इव्हान रॅकिटीक, लुका मॉड्रिक, डोमागोज व्हिडा हे फॉर्मात असलेले खेळाडू पोर्तुगालची कमकुवत बचावफळी सहज भेदतील असे चित्र रंगवण्यात आले होते. मात्र, घडले भलतेच. पोर्तुगालने साखळी गटातील चुकांचा अभ्यास करून मैदानात उडी मारली होती. ४-४-२ (बचावपटू-मध्यरक्षक-आक्रमणपटू) या रणनीतीने त्यांनी क्रोएशियाचा प्रत्येक वार परतवून लावला. पोर्तुगालची अभेद्य बचावफळी भेदण्यात क्रोएशियाला सातत्याने अपयश येत होते. क्रोएशियाचा मध्यरक्षक मार्सेलो ब्रोझोव्हीक आणि बचावपटू व्हिडा यांनी दुसऱ्या सत्रात गोल करण्याची संधी गमावली. त्यामुळे निर्धारित ९० मिनिटांच्या खेळात सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. अतिरिक्त ३० मिनिटांच्या खेळातही ही कोंडी फुटण्याची शक्यता धूसरच दिसत होती. पोर्तुगालपेक्षा क्रोएशियाला गोल करण्याच्या अनेक संधी चालून आल्या, परंतु नशीब त्यांच्यावर रुसले होते. ११७व्या मिनिटाला क्युरेस्माने गोलजाळीजवळून हेडरद्वारे गोल करत पोर्तुगालचा विजय निश्चित केला.

१३

युरो चषक स्पध्रेतील मागील १३ लढतीत क्रोएशियाला केवळ एकदाच गोल करण्यात अपयश आले. २०१२मध्ये स्पेनविरुद्ध त्यांना गोल करता आला नव्हता.

०६

पोर्तुगालने सलग सहाव्यांदा युरो चषक स्पध्रेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मागील चार हंगामापैकी तीनवेळा त्यांना उपांत्य फेरीत प्रवेश करता आला.

१९९८

क्रोएशियाने १९९८च्या विश्वचषक स्पध्रेत उपांत्यपूर्व फेरीचा अडथळा पार केला होता.

१९९६

क्रोएशिया आणि पोर्तुगाल यांच्यात १९९६च्या युरो स्पध्रेत पोर्तुगालने ३-० असा विजय मिळवला होता. लुईस फिगो, जोआओ आणि डॉमिंगोस डे ऑलिव्हेरा यांनी प्रत्येकी एक गोल केला होता.

१०

युरो चषक स्पध्रेतील सलग दहा सामन्यांत अपराजित राहण्याचा क्रोएशियाचा (८ विजय व २ अनिर्णीत) विक्रम पोर्तुगालने मोडला.

 

आम्ही अथक मेहनत घेतली. या लढतीत कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागेल याची कल्पना होती आणि त्यानुसार आम्ही खेळ केला. या विजयानंतर सर्वाचे अभिनंदन करायला हवे. अखेरच्या क्षणापर्यंत स्वत:वर विश्वास कायम राखला.

– रिकाडरे क्युरेस्मा

हा सामना अटितटीचा होता. पोर्तुगालने कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला, परंतु क्रोएशिया हार मानण्यास तयार नव्हते. त्यांच्या आव्हानासाठी आम्ही सज्ज होतो आणि त्यांच्या कमकुवत बाबींचा आम्ही पुरेपूर फायदा उचलला.

– फर्नाडो सँटोस, पोर्तुगालचे प्रशिक्षक