फुटबॉल विश्वातील सर्वोच्च असा दिला जाणारा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूचा ‘बॅलोन डी ओर’ पुरस्कार क्रोएशियाचा कर्णधार ल्युका मॉड्रीच याला देण्यात आला. या पुरस्कारामुळे तब्बल १० वर्षानंतर हा पुरस्कार एका नव्या खेळाडूला मिळाला. गेल्या दहा वर्षात हा पुरस्कार पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तीयानो रोनाल्डो आणि अर्जेंटिनाचा लिओनेल मेसी यांच्यापैकीच एकाला मिळत होता. पण अखेर तब्बल १० वर्षांनंतर फुटबॉल जगताला नवा हिरो मिळाला.

२०१८ या वर्षातील ‘बॅलोन डी ओर’ पुरस्कारावर मॉड्रिचच्या नावाची मोहोर उमटली. रोनाल्डो आणि मेसी यांच्यापेक्षा तब्बल २७७ गुणांच्या फरकाने हा पुरस्कार मॉड्रीचने जिंकला. या दर्जाची कामगिरी करणारा तो क्रोएशियाचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेतदेखील त्याला चांगल्या कामगिरीसाठी गौरविण्यात आले होते. मॉड्रिचसाठी हे वर्ष अविस्मरणीय राहिले. त्याने विश्वचषक स्पर्धेत गोल्डन बॉल, ‘युएफा’चा सर्वोत्तम खेळाडू, ‘फिफा’चा सर्वोत्तम खेळाडू आणि आता ‘बॅलोन डि ओर’ असे मानाचे पुरस्कार पटकावले. फुटबॉल इतिहासात एकाच वर्षात हे चारही पुरस्कार जिंकणारा मॉड्रिच पहिलाच खेळाडू ठरला.

ॲडा हिगेर्बर्ग हिला सर्वोकृष्ट महिला फुटबॉलपटूचा पुरस्कार मिळाला.

मॉड्रिचने ७५३ गुणांसह वर्चस्व राखले. रोनाल्डोला या शर्यतीत केवळ ४७६ आणि ॲंटोइन ग्रिझमनला ४१४ गुण होते. या पुरस्कारासाठी प्रबळ दावेदार समजला जाणारा फ्रान्सचा कायलिन एमबापे याला ३४७ गुणांसह चौथ्या स्थानावर राहावे लागले. मेस्सीला केवळ २८० गुण मिळाले.