मारिओ मॅँडझुकीच, डॅनीजेल सबासिच आणि व्हेडरान कोर्लुका निवृत्त

पॅरिस : फिफा विश्वचषकातील क्रोएशियाच्या उपविजेतेपदात मोठे योगदान दिलेला आघाडीचा आक्रमक फुटबॉलपटू मारिओ मॅँडझुकीच (३२), गोलरक्षक डॅनीजेल सबासिच (३३) आणि उपकर्णधार व्हेडरान कोर्लुका (३२) यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला विराम देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

या निर्णयाबाबत मारिओ म्हणाला, ‘‘मला असे वाटते की निवृत्त होण्याची वेळ आली आहे. मी माझ्या क्रोएशियासाठी माझ्या परीने सर्वोत्तम योगदान दिले आहे. विश्वचषक फुटबॉलमधील अफलातून कामगिरीचा भागीदार झाल्याचा आणि क्रोएशियाच्या इतिहासातील सर्वात मोठय़ा विजयातही मला सहभागी होता आल्याचा आनंद आहे.’’

मारिओने दिलेले पत्र क्रोएशिया फुटबॉल संघटनेच्या वतीने माध्यमांना देण्यात आले. त्यात त्याने म्हटले आहे की, ‘‘विश्वचषकातील उपविजेतेपदाने मला खूप ऊर्जा दिली आहे. किंबहुना त्यामुळेच मला हा निवृत्तीचा निर्णय घेणे सोपे झाले आहे. निवृत्तीसाठी कोणतीही वेळ योग्य, अयोग्य नसते. शक्य झाले तर आम्ही आयुष्यभर देशासाठी खेळलो असतो. पण ते शक्य नाही. त्यामुळे आता हीच वेळ योग्य असल्याचा कौल माझ्या मनाने दिला आणि त्याप्रमाणे निर्णय घेतला.’’ त्याने क्रोएशियाकडून खेळलेल्या ८९ सामन्यांमध्ये ३३ गोल लगावले आहे. क्रोएशियाकडून सर्वाधिक गोल लगावलेल्या डेव्होर सुकर यांच्यापेक्षा ही संख्या अवघी दोन गोलने कमी आहे. युरोपिअन स्पर्धेमध्ये क्रोएशियाचे प्रतिनिधित्व करताना मारिओला २०१२ आणि २०१३चा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कारदेखील प्रदान करण्यात आला होता.

निवृत्तीबाबत सबासिच म्हणाला की ‘‘क्रोएशियाची राजधानी झ्ॉगरेबमध्ये आमचे झालेले अभूतपूर्व स्वागत तसेच माझे शहर असलेल्या झादारमध्ये झालेला उत्सव हे माझ्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचे क्षण होते. विश्वचषकात मी माझ्या संघाच्या विजयासाठी सर्वतोपरी योगदान दिले. त्याचा मला अभिमान आहे. माझ्या देशाकडून खेळायला मिळाले, हा माझा सर्वात मोठा सन्मान होता. त्या अभिमान आणि सन्मानासह मी निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. हा आनंद, एकसंधपणा, खेळाडूंशी जमलेली मैत्री आणि देशवासीयांच्या सद्भावना आयुष्याच्या अंतापर्यंत माझ्याबरोबर राहणार आहेत.’’

मारिओचे तीन गोल

क्रोएशियाने अनपेक्षितपणे विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. त्यात मारिओने केलेल्या तीन गोलचे योगदान मोलाचे होते. त्यात डेन्मार्कविरुद्धचा गोल, उपांत्य सामन्यात इंग्लंडविरुद्ध अतिरिक्त वेळेत केलेला गोल निर्णायक ठरला होता, तर अंतिम सामन्यात फ्रान्सकडून क्रोएशियाला ४-२ असा पराभव स्वीकारावा लागला असला तरी त्या सामन्यातदेखील मारिओने एक गोल लगावत त्याचे कर्तव्य पार पाडले होते.

सबासिचचे अफलातून रक्षण

डेन्मार्कसमवेत निर्धारित व अतिरिक्त वेळेतदेखील गोलबरोबरी राहिल्याने तो सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला होता. त्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यातील पेनल्टी शूटआऊटमध्ये तीन वेळा अफलातून गोलरक्षण करीत त्याने क्रोएशियाचा मार्ग निर्वेध केला होता. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत रशियाची आक्रमणे परतवून लावत क्रोएशियाला आगेकूच करून दिली होती.

कोर्लुकाची जिद्द

मध्यरक्षक म्हणून क्रोएशियासाठी शंभराहून अधिक सामने खेळलेल्या कोर्लुकाने विश्वचषकातदेखील संघाच्या बचावफळीत अमूल्य योगदान दिले. विश्वचषकातील त्याच्या कामगिरीपूर्वी २०१६ सालच्या युरो चषकात तुर्कीविरुद्धच्या पहिल्याच सामन्यातील एका प्रसंगाने कोर्लुकाला जगविख्यात केले होते. तो हेडर मारण्याच्या प्रयत्नात असताना विरोधी खेळाडूने मारलेल्या जोरदार किकचा तडाखा त्याच्या डोक्यात बसला. त्यामुळे डोक्यातून रक्तबंबाळ अवस्थेत तो काही क्षण मैदानाबाहेर गेला. पण त्याला मलमपट्टी करून तो पुन्हा जिद्दीने मैदानावर उतरून संपूर्ण सामनाभर खेळल्याने त्याच्या जिद्दीचे खूप कौतुक झाले होते. तसेच हॅरी पॉटरसारखा टॅटू हातावर मिरवणारा खेळाडू म्हणूनदेखील तो फुटबॉलविश्वात लोकप्रिय होता.