क्रोएशियाच्या आक्रमक खेळापुढे कॅमेरूनने अक्षरश: शरणागती पत्करली. आक्रमणवीर मारिओ मांझुकिक क्रोएशियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. दुसऱ्या सत्रात मांझुकिकने झळकावलेल्या दोन गोलांच्या बळावर क्रोएशियाने ४-० अशा फरकाने ‘विजयाचा चार चाँद’ लावला. ‘अ’ गटातील दोन्ही सामने गमावल्यामुळे कॅमेरूनचे आव्हान संपुष्टात आले.
सलामीच्या सामन्यात यजमान ब्राझीलकडून हार पत्करणाऱ्या क्रोएशियाच्या संघाने दुसऱ्या सामन्यात दणदणीत विजय मिळवून आपले आव्हान जीवंत राखले आहे. कॅमेरूनचा संघ अखेरची ५० मिनिटे दहा खेळाडूंसह खेळला. कारण अ‍ॅलेक्सांड्रे साँगने मांझुकिकच्या पाठीवर ठोसा मारल्याप्रकरणी रेफरीने त्याला लाल कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढले. त्याला ब्राझीलविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात एका सामन्याच्या निलंबनामुळे खेळू शकला नव्हता.
अनुभवी आक्रमणपटू इव्हिका ऑलिचने ११व्या मिनिटाला झळकावलेल्या गोलमुळे क्रोएशियाकडे पहिल्या सत्रात १-० अशी आघाडी होती. मग दुसऱ्या सत्रात इव्हान पेरिसिकने आणखी एका गोलची भर घातली. त्यानंतर मांझुकिकने आणखी दोन गोल झळकावत संघाचे वर्चस्व सिद्ध केले. कॅमेरूनचा महत्त्वाचा खेळाडू सॅम्युएल इटो गुडघ्याच्या दुखापतीतून न सावरल्यामुळे या सामन्यात खेळू शकला नाही. इटोची उणीव संघाला तीव्रतेने भासली.
निको कोव्हाकच्या मार्गदर्शनाखालील क्रोएशियाचा संघ सध्या गुणतालिकेत ‘अ’ गटात तिसऱ्या स्थानावर आहे. ब्राझील आणि मेक्सिको हे दोन संघ प्रत्येकी चार गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत. क्रोएशियाचा संघ सोमवारी रेकिफे येथे मेक्सिकोशी भिडणार आहे. त्यानंतरच दुसऱ्या फेरीसाठी कोणते दोन संघ पात्र ठरतील, हे निश्चित होऊ शकेल.