क्रोएशियासारख्या सामान्य खेळाडूंचा भरणा असलेल्या खेळाडूंच्या संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारल्यानंतर उपविजेतेपदावर त्यांना समाधान मानावे लागले होते. त्यामुळे या खेळाडूंना मिळालेले रौप्यपदक त्या खेळाडूंनी मोठय़ा दिमाखात मिरवत नेले. मात्र, ऐन स्पर्धेदरम्यान क्रोएशियात माघारी पाठवलेला आक्रमक निकोला कॅलिनीचने हे पदक स्वीकारण्यास नकार दिला आहे.

क्रोएशियाने कुणाच्या ध्यानीमनी नसताना उपान्त्य आणि अंतिम सामन्यापर्यंत धडक मारून थेट उपविजेतेपदाला गवसणी घातली होती. मात्र, नायजेरियाविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात निकोला कॅलिनीचला सामन्याच्या उत्तरार्धात अगदी ८५व्या मिनिटापर्यंत उतरू दिले नव्हते. तेव्हा क्रोएशिया हा सामना जिंकण्याच्या बेतात असताना त्याला प्रशिक्षकांनी मैदानात जाण्यास सांगितले. परंतु कॅलिनीचने पाठदुखीचे कारण देत प्रशिक्षकांचा आदेश न मानल्याने त्याला नायजेरियाच्या सामन्यानंतर तात्काळ घरी पाठवण्यात आले होते. त्या पाश्र्वभूमीवर क्रोएशियाला पदक मिळाले तरी ते कॅलिनीचला देणार की नाही? त्याबाबत फुटबॉलप्रेमींमध्ये उत्सुकता होती. मात्र, कॅलिनीचनेच शुक्रवारी रात्री त्याबाबत खुलासा केला आहे. त्याने सांगितले की, ‘‘रशियातील विश्वचषक स्पध्रेत मी एकही सामना खेळलो नसल्याने ते पदक स्वीकारणार नाही.’’

अहंकारामुळे घात

कॅलिनीच एकेकाळी ब्लॅकबर्न रोव्हर्सकडून खेळलेला आणि सध्या एसी मिलानचा मुख्य आक्रमक म्हणून चांगली कामगिरी बजावत होता. त्यामुळे क्रोएशिया संघाकडून आपल्याला योग्य न्याय मिळेल, अशी त्याला अपेक्षा होती. मात्र नायजेरियाविरुद्धच्या सामन्यात त्याला धक्का बसला. सामन्याच्या अखेरच्या पाच मिनिटांत मैदानात उतरण्यास सांगितल्याने कॅलिनीचला हा त्याचा अपमान वाटला. त्यामुळे अहंकाराचे दर्शन घडवत आणि पाठदुखीचे कारण देत त्याने सामन्यात उतरण्यास नकार दिला होता.