क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा समाना जिंकून आपली विजयी घौडदौड कायम राखली आहे. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात आफ्रिकेवर मात करत आश्वासक सुरुवात केल्यानंतर कालच्या सामन्यात ऑस्ट्रेलियावरही ३७ धावांनी विजय मिळवला. लंडनमधील ओव्हलच्या मैदानावर रंगलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याला भारतीय बँकाना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून पसार झालेल्या विजय मल्ल्यानेही हजेरी लावली होती. सामना संपल्यानंतर माल्या मैदानाबाहेर पडताना भारतीय क्रिकेट चाहत्यांनी ‘चोर है.. चोर है’ अशा घोषणा दिल्या. एएनआय वृत्तसंस्थेने यासंदर्भातील व्हिडिओ शेअर केला आहे.

भारताने ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर ओवल मैदानाबाहेर भारतीय चाहत्यांनी जंगी सेलिब्रेशन केले. याच दरम्यान माल्या मैदानातून आई आणि आपल्या मुलासहीत बाहेर पडला. त्यावेळी भारतीय क्रिकेट चाहत्यांनी ‘चोर है.. चोर है’ अशी घोषणाबाजी करत त्याला मैदानातून निरोप दिला. या गोंधळानंतर एएनआयने माल्याला या घोषणाबाजीवर काय प्रतिक्रिया द्याल असा प्रश्न विचारला. ‘(गर्दीमध्ये) माझ्या आईला इजा पोहचणार नाही याची मी काळजी घेत आहे,’ असं माल्याने एनएआयला सांगितले.

सामन्याआधी एएनआयशी बोलताना माल्याने, ‘मी येथे केवळ सामना पाहण्यासाठी आलो आहे’ असे सांगत इतर प्रश्नांना उत्तर देणे टाळले होते. मात्र भारताच्या विजयानंतर माल्याने ट्विट करुन भारतीय संघाला आणि कर्णधार विराट कोहलीला शुभेच्छा दिल्या. माझ्या मुलाबरोबर भारतीय संघाचा खेळ पाहताना आनंद झाला असं माल्याने या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान भारतातील बँकांना करोडोंचा चुना लावून पसार झालेल्या मल्ल्याच्या प्रत्यार्पणासंदर्भात ब्रिटन आणि भारतामध्ये वाटाघाटी सुरु आहेत.