आयपीएल स्पर्धेदरम्यान चौकार आणि षटकारांसोबत अनोख्या नात्यांचंही दर्शन घडतं. असंच चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स सामन्यापूर्वी पाहायला मिळालं. चेन्नईच्या वेगवान गोलंदाज दीपक चहरनं आपल्या कृतीमुळे क्रीडा रसिकांची मनं जिंकली. सामना सुरु होण्यापूर्वी दीपक चहर मोहम्मद शमीच्या पाया पडला. हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चाहतेही या फोटोवर लाईक्सचा वर्षाव पाडत आहेत.

या सामन्यात दीपक चाहरनं उत्तम गोलंदाजी केली. त्याने ४ षटकात १३ धावा देत चार गडी बाद केले. तर एक षटक निर्धाव टाकलं. दीपकने मयंक अग्रवाल, ख्रिस गेल, दीपक हुड्डा आणि निकोलस पूरन यांना तंबूत पाठवलं. तर मयंक अग्रवाल आणि निकोलस पूरनला खातंही खोलू दिलं नाही. त्याने टाकलेल्या २४ चेंडूपैकी १८ चेंडूवर एकही धाव आली नाही. यावरूनच त्याच्या गोलंदाजीचा अंदाज येतो. २०१७ मधील पदार्पणानंतर चहर आयपीएलमधील पहिल्या ६ षटकांत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. त्यामुळे दीपकच्या नावावर ३६ बळींची नोंद झाली आहे. या विक्रमात दुसरा क्रमांक उमेश यादवचा आहे, त्याने आयपीएलच्या पहिल्या ६ षटकांत २५ बळी घेतले आहेत. आयपीएलमधील दीपक चहरचे हे सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन आहे. चहरची मागील सर्वोत्कृष्ट कामगिरी २०१८मध्ये हैदराबादविरुद्ध १५ धावांत ३ बळी अशी होती.

IPL 2021 : पंजाबच्या डावाला सुरूंग लावत दीपक चहरने रचले नवे विक्रम

गुरु शिष्याच्या या नात्यात असलेल्या मोहम्मद शमीनेही चांगली गोलंदाजी केली. त्या ४ षटकात २१ धावा देत २ गडी बाद केले. सुरेश रैना आणि अंबाती रायडू यांना तंबूत परत पाठवलं. मात्र धावसंख्या कमी असल्याने चेन्नईने हा सामना सहज जिंकला. चेन्नईने पंजाब विरुद्धचा सामना ६ गडी आणि २६ चेंडू राखून जिंकला. या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. चेन्नईचा निर्णय योग्य ठरला. चेन्नईच्या गोलंदाजांनी पंजाबला १०६ धावांवर रोखलं. त्यामुळे चेन्नईच्या फलंदाजांवर दडपण कमी राहिलं आणि सामना सहज जिंकला.