बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात रविंद्र जडेजानं केलेल्या कामगिरीनंतर चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे ८ वर्षांपूर्वीचे एक ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. धोनीचे हे जुने ट्विट पुन्हा एकदा परत आले आहे. ‘देवाला कळलं की, रजनीकांत म्हातारा झालाय म्हणून त्यांनं सर रविंद्र जडेजाला निर्माण केलं’, असं ट्वीट महेंद्रसिंह धोनीनं ९ एप्रिल २०१३ रोजी केलं होतं. तेव्हापासून रविंद्र जडेजाला सर ही उपाधी लागू झाली होती. प्रत्येक कामगिरीनंतर सर म्हणून त्याचा गौरव केला गेला. बंगळुरुविरुद्धच्या सामन्यातही त्यांनं अष्टपैलू कामगिरी केली. त्यामुळेच धोनीचं जुनं ट्वीट पुन्हा व्हायरल होत आहे.

मुंबईतील वानखेडे मैदानात शेवटच्या षटकात हर्षल पटेलची धुलाई करत रविंद्र जडेजानं संघाला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत केली. हर्षल पटेलच्या षटकात एकूण ३७ धावा आल्या. या षटकात जडेजानं ५ षटकार आणि एक चौकार ठोकला. त्याच्या फलंदाजीपुढे पर्पल कॅपचा मानकरी असलेला हर्षल पटेल पुरता हतबल दिसला. या सामन्यात जडेजाने २८ चेंडूत ६२ धावांची खेळी केली. या खेळीत ४ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश आहे. फलंदाजीसोबत रविंद्र जडेजाने गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही कमाल दाखवली. त्याने ४ षटकात १३ धावा देत ३ गडी बाद केले. त्यात त्याने एक षटक निर्धाव टाकलं. तसेच क्षेत्ररक्षणात आपली कसब दाखवत डॅन ख्रिश्चनला धावचीत केलं. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं.

IPL २०२१ : म्हणूनच ‘सर’ रवींद्र जडेजा..एका षटकात कुटल्या ३७ धावा!

जडेजानं दिल्ली विरुद्ध १७ चेंडूत २६ धावा केल्या. त्यात ३ चौकारांचा समावेश होता. तर २ षटकं टाकत १६ धावा दिल्या. पंजाब विरुद्धच्या सामन्यात त्याला फलंदाजी मिळाली नाही. मात्र ४ षटकं टाकत १९ धावा देत धावसंख्या रोखण्यास मदत केली. राजस्थान विरुद्धच्या सामन्यात ८ धावा करून तंबूत परतला. मात्र गोलंदाजीत ४ षटकं टाकत २८ धावा देत २ गडी बाद केले. कोलकाता विरुद्धच्या सामन्यात ६ धावांवर नाबाद राहिला. तर ४ षटकं टाकत ३३ धावा दिल्या.

‘‘माझे शब्द लक्षात ठेवा…IPLच्या शेवटी शुबमन सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असेल”

चेन्नईनं दिल्लीविरुद्धच्या पहिला सामना गमवल्यानंतर सलग चार सामन्यात विजय मिळवला आहे. पंजाब, राजस्थान, कोलकाता आणि बंगळुरुला पराभूत करत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे.