आयपीएल स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजीप्रकरणी गेले वर्षभर चेन्नई सुपर किंग्जचा संघ हा केंद्रस्थानी आहे. आयपीएलच्या सातव्या मोसमावरही संशयाचे धुके पसरले आहे. देशातील निवडणुकांमुळे संयुक्त अरब अमिरातीमध्ये पहिला टप्पा यशस्वीपणे झाला. दुसऱ्या टप्प्यात प्रारंभी क्रिकेटरसिकांनी निरुत्साह दाखवला, परंतु अखेरच्या टप्प्यात मात्र या ट्वेन्टी-२० स्पध्रेने आपले गारूड निर्माण केले आहे. रविवारी गतविजेत्या मुंबई इंडियन्सने अनपेक्षितपणे राजस्थान रॉयल्सला हरवून ‘प्ले-ऑफ’मध्ये आपले स्थान पक्के केले. तर बुधवारी दोन धक्कादायक निकालांची नोंद झाली. ईडन गार्डन्सवर कोलकाता नाइट रायडर्सने चक्क गुणतालिकेतील ‘अव्वल नंबरी’ किंग्ज इलेव्हन पंजाबला धूळ चारली, तर ब्रेबॉर्न स्टेडियवर चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा ‘खेळ खल्लास’ केला. आता शुक्रवारी वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातील लढतीद्वारे रविवारी एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या अंतिम फेरीसाठी कोलकाता नाइट रायडर्सचा प्रतिस्पर्धी ठरणार आहे.
आयपीएलच्या मागील सहा हंगामांकडे नजर टाकल्यास २००९मध्ये द. आफ्रिकेत झालेला दुसरा हंगाम वगळता प्रत्येक वर्षी चेन्नई सुपर किंग्ज विजेता किंवा उपविजेता ठरला आहे. त्यामुळे ‘चेन्नई एक्स्प्रेस’ची वाटचाल रोखणे ही कठीण गोष्ट आहे. दुसरीकडे किंग्ज इलेव्हन पंजाबने २००८च्या पहिल्या हंगामात तिसरे स्थान पटकावले होते, परंतु हा अपवाद वगळल्यास त्यानंतरच्या प्रत्येक हंगामात हा संघ विजयासाठी झगडतानाच आढळला आहे. पण यंदा ग्लेन मॅक्सवेलने कमाल केली आहे. त्याने प्रतिस्पर्धी संघ, देशोदेशीचे गोलंदाज यांच्यापैकी कुणाचीही तमा न बाळगता आक्रमणाचे हत्यार उपसले. त्यामुळे १४ सामन्यांपैकी ११ जिंकत २२ गुणांसह पंजाबने दिमाखात ‘प्ले-ऑफ’मध्ये स्थान मिळवले. यंदाच्या आयपीएलमध्ये अबू धाबी आणि कटक या दोन्ही ठिकाणी पंजाबने चेन्नईला हरवण्याचे कर्तृत्व दाखवले आहे. या दोन्ही सामन्यांत ऑस्ट्रेलियाचा २५ वर्षीय फलंदाज मॅक्सवेलने ९०पेक्षा अधिक धावा काढण्याची किमया साधली होती. या पाश्र्वभूमीवर चेन्नईला सर्वाधिक धोका हा मॅक्सवेलपासून आहे. परंतु आयपीएलच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर पंजाबकडून पत्करलेल्या पराभवाचा वचपा काढण्याची चांगली संधी चेन्नईला मिळणार आहे.
मॅक्सवेलच्या खात्यावर आता ५३९ धावा जमा असून, ‘ऑरेंज कॅप’ रांगेत तो तिसऱ्या स्थानावर आहे. अबू धाबीच्या सामन्यात चेन्नईचे २०६ धावांचे लक्ष्यसुद्धा पंजाबने सहजगत्या पेलले होते. मॅक्सवेलच्या ४३ चेंडूंतील ९५ धावांचा त्यात सिंहाचा वाटा होता. कटकलासुद्धा धावांचा पाऊस पडला होता. पंजाबने २३१ धावांचा डोंगर उभारला होता. यात मॅक्सवेलच्या ३८ चेंडूंत ६ चौकार आणि ८ षटकारांसह साकारलेल्या ९० धावांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. या दोन्ही सामन्यांमध्ये मॅक्सवेलने आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा यांना चांगलाच चोप दिला होता. त्यामुळे चेन्नईच्या संघव्यवस्थापनाला मॅक्सवेलला वेसण घालण्यासाठी खास योजना आखावी लागणार आहे. या पाश्र्वभूमीवर शुक्रवारी वानखेडेवर धावांचा पाऊस पडो आणि आणखी एका थरारनाटय़ाची अनुभूती मिळो, अशीच क्रिकेटरसिकांची अपेक्षा आहे.
साखळीमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब आणि मॅक्सवेलचा प्रवास अतिशय झोकात सुरू होता, परंतु आता स्पध्रेच्या महत्त्वाच्या टप्प्यात त्यांचा धीर खचला आहे. बुधवारी ‘क्वॉलिफायर-१’ सामन्यात पंजाबने कोलकाताकडून हार पत्करली. याशिवाय मॅक्सवेलचासुद्धा धावांचा प्रवाह थोडासा आटला आहे. शेवटच्या चार सामन्यांत त्याला फक्त एकूण २२ धावाच काढता आल्या आहेत. पण आता प्रथमच अंतिम फेरी गाठण्यासाठी पंजाबला अखेरची संधी आहे, याची त्यांना पूर्ण जाणीव आहे.
चेन्नई सुपर किंग्जने बुधवारी आपली ड्वेन स्मिथच्या साथीने ब्रेंडन मॅक्क्युलमऐवजी फॅफ डय़ू प्लेसिसकडे सलामीची धुरा सोपवली. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी रचून हा विश्वास सार्थ ठरवला. स्मिथच्या खात्यावर एकंदर ५५९ धावा जमा असून, तो फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. सुरेश रैनाने महत्त्वाच्या सामन्यात जबाबदारीने खेळत ३३ चेंडूंत नाबाद ५४ धावा केल्या. तसेच अनुभवी डेव्हिड हसीनेही त्याला छान साथ दिली. त्यामुळेच मुंबईच्या बालेकिल्ल्यावर चेन्नईला हे आव्हान पेलणे जड गेले नाही.
संघ
किंग्ज इलेव्हन पंजाब : जॉर्ज बेली (कर्णधार), वीरेंद्र सेहवाग, मनन व्होरा, वृद्धिमान साहा, ग्लेन मॅक्सवेल, डेव्हिड मिलर, अक्षर पटेल, रिशी धवन, मिचेल जॉन्सन, करणवीर सिंग, एल. बालाजी, संदीप शर्मा, परविंदर अवाना, ब्युरान हेंड्रिक्स, शॉन मार्श, चेतेश्वर पुजारा, मनदीप सिंग, शार्दूल ठाकूर, शिवम शर्मा, अनुरित सिंग, गुरकिराट सिंग मान, मुरली कार्तिक.
चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, फॅफ डय़ू प्लेसिस, ब्रेंडन मॅक्क्युलम, ड्वेन स्मिथ, आशीष नेहरा, मोहित शर्मा, सॅम्युएल बद्री, बेन हिल्फेनहॉस, मॅट हेन्री, बाबा अपराजित, मिथुन मन्हास, इश्वर पांडे, पवन नेगी, विजय शंकर, रोनित मोरे, जॉन हेस्टिग्स.