बहुप्रतिक्षित IPL 2020ची अधिकृत घोषणा BCCIने केली. IPL गव्हर्निंग काऊन्सिलने युएईमध्ये खेळवल्या जाणाऱ्या तेराव्या हंगामाची अधिकृत घोषणा केली. १९ सप्टेंबरपासून स्पर्धेची सुरुवात होणार आहे. तर स्पर्धेचा अंतिम सामना १० नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व संघ आणि खेळाडू हळूहळू IPLसाठी तयारी करू लागले आहेत. भारतातील करोना व्हायरसची सर्व देशभर असलेली परिस्थिती पाहता ही स्पर्धा युएईमध्ये हलविण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक संघ आपल्या खेळाडूंच्या करोना चाचण्या घेत असून त्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचीही करोना घेण्यात आली आहे.

जुलै २०१९ पासून क्रिकेटपासून दूर असलेला माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या रांची येथे आहे. धोनी आता हळूहळू IPL 2020च्या तयारीसाठी काही प्रशिक्षण सत्रात भाग घेत आहे. याच दरम्यान टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, धोनी आणि त्याच्या चेन्नई सुपर किंग्जचा सहकारी मोनू कुमारने बुधवारी आपल्या कोविड चाचणीचा नमुना दिला आहे.

कोविड-१९ साठी आरटी-पीसीआर चाचणी घेण्यास अधिकृत परवानगी असलेल्या गुरु नानक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचा एक भाग असलेल्या मायक्रोप्रॅक्सिस लॅबच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने धोनीच्या फार्महाऊसमधून आवश्यक नमुने घेतल्याची माहिती दिली. आमच्या प्रयोगशाळेतील कर्मचार्‍यांची टीम दुपारी अडीचच्या सुमारास सिमलैया भागातील धोनीच्या फार्महाऊस येथे गेली होती. तिथून घेण्यात आलेले नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्याचा निकाल गुरुवारी येणार असल्याचे त्या अधिकाऱ्याने सांगितले.