एकेकाळचा चेन्नई सुपर किंग्ज संघाचा क्रिकेटपटू सुब्रमण्यम बद्रिनाथ याने आज अचानक सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. भारतीय संघात स्थान मिळत नाही, याचा अंदाज घेत आपल्या वाढदिवशीच त्याने हा निर्णय घेतला. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकूण ३२ शतके ठोकली असून ५५च्या सरासरीने त्याने १० हजार २४५ धावा केल्या. पण तरीदेखील त्याला भारतीय संघात स्थान मिळू शकले नाही. म्हणून त्याने निवृत्तीचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

मी माझ्या ३८ वर्षांपैकी सुमारे १७ वर्षे व्यावसायिक क्रिकेट खेळतो आहे. हा प्रवास खूप चांगला होता. वेळ कसा निघून गेला हे समजलेदेखील नाही. पण आता मी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निऊर्टचा होण्याचा निर्णय घेत आहे. माझ्यासाठी हा निर्णय घेणे हे तितकेसे सोपे नव्हते. माझा हात निवृत्तीच्या पत्रावर सही करण्यास धजावत नव्हता. पण माझे वय पाहता हीच थांबण्याची वेळ आहे हे मी मनाशी ठरवले, असे तो म्हणाला.

बद्रिनाथने २०१०-११ साली १० आंतरराष्ट्रीय सामने खेळले होते. कसोटी क्रिकेटच्या पदार्पणातच त्याने अर्धशतक झळकावले होते. त्याचे हे अर्धशतक पहिल्याच डावात आले होते. पण पुढे त्याला आपली लय कायम राखता न आल्याने आणि त्याला पुरेशी संधी न मिळाल्याने तो केवळ दोन कसोटी, सात एकदिवसीय आणि एका टी२० सामन्यात भारताचे प्रतिनिधत्व करू शकला. मात्र चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना त्याने अनेक सामन्यात संघाला विजय मिळवून दिला.