आयपीएलची तीन विजेतेपदे पटकावलेल्या चेन्नई सुपर किंग्जने यंदाच्या पर्वासाठी आपली नवीन जर्सी समोर आणली आहे. वर्ष 2008मध्ये आयपीएलला सुरुवात झाल्यापासून चेन्नईच्या संघाने पहिल्यांदाच आपल्या जर्सीत बदल केला आहे. त्यामुळे यावेळी आयपीएलमध्ये चेन्नईचे खेळाडू नवीन जर्सीत दिसतील. नवीन जर्सीमध्ये भारताच्या सशस्त्र दलाचा सन्मान म्हणून ‘कॅमोफ्लॉज’देखील आहे. विशेष म्हणजे, ही जर्सी पर्यावरणाला समोर ठेऊन बनवण्यात आली असून या जर्सीसाठी प्लास्टिकच्या बाटल्या वापरल्या गेल्या आहेत.

फ्रेंचायझीने या जर्सीबाबत माहिती दिली. सीएसकेची एक रेप्लिका जर्सी बवनण्यासाठी 15 प्लास्टिकच्या बाटल्या रिसायकल करून वापरल्या गेल्या आहेत. तसेच या नव्या जर्सीमध्ये वापरण्यात येणारे दर्जेदार पॉलिस्टर इतरांपेक्षा 90 टक्के कमी पाणी शोषून घेते. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा संघ आतापर्यंत दहावेळा प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. तेथे त्यांनी आठ वेळा अंतिम फेरीत धडक दिली आहे.

कशी आहे सीएसकेची जर्सी?

चेन्नईच्या जर्सीचा रंग आधीप्रमाणेच पिवळा आहे, पण खांद्यावर भारतीय लष्कराचा सन्मान म्हणून आर्मीच्या ‘कॅमोफ्लॉज’चा समावेश करण्यात आला आहे. शिवाय फ्रेंचायझीच्या ‘लोगो’च्या वरती तीन स्टार आहेत. 2010, 2011 आणि 2018मध्ये आयपीएलचा  किताब जिंकल्याचे हे तीन स्टार दर्शवतात. चेन्नई सुपर किंग्जने जर्सी अनावरण करतानाचा धोनीचा एक व्हिडिओ शेअर करून याबाबत माहिती दिली.

 

दरम्यान, 9 एप्रिलपासून यंदाच्या आयपीएलला सुरुवात होणार आहे. तर, 30 मे रोजी फायनल खेळवली जाईल. गेल्या वर्षी करोना व्हायरसमुळे यूएईमध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पण, यंदा पुन्हा एकदा आयपीएलचे भारतात पुनरागमन होणार आहे.