करोना विषाणू संसर्गामुळे क्रिकेट पुन्हा कधी सुरू होईल याची शाश्वती नाही. मात्र क्रिकेट सुरू झाले तर इंडियन प्रीमियर लीगपेक्षा (आयपीएल) मायदेशात ट्वेन्टी-२० विश्वचषक खेळायला जास्त आवडेल, असे वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने सांगितले.

यंदाच्या ‘आयपीएल’ लिलावात कमिन्स सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. त्याला १५.५० कोटी रुपयांना कोलकाता नाइट रायडर्सने करारबद्ध केले होते. ‘‘दोन ते तीन वर्षांपासून आपण ट्वेन्टी-२० विश्वचषकाची चर्चा करत आहोत. २०१५मध्ये मायदेशात म्हणजेच ऑस्ट्रेलियात झालेला एकदिवसीय विश्वचषक माझ्या कारकीर्दीतील सर्वोत्तम होता. त्यावेळेस मला अंतिम फेरीत खेळता आले नव्हते. यंदा पुन्हा मायदेशात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात खेळण्यासाठी आतूर आहे,’’ असे कमिन्स याने सांगितले.

‘आयपीएल’ स्पर्धा खेळवण्यात आली तरी त्यात खेळण्यास मी फारसा उत्सुक नसल्याचे कमिन्स सांगतो. ‘‘ट्वेन्टी-२० विश्वचषक ही या वर्षांत होणारी सर्वोत्तम स्पर्धा आहे. मात्र ‘आयपीएल’ जरी खेळवण्यात आली तरी मला आवडेल,’’ असे कमिन्स याने सांगितले.

‘आयपीएल’ स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली असली तरी अद्याप त्याबाबत कोणताही अधिकृत निर्णय घेण्यात आलेला नाही.