22 January 2019

News Flash

वयाच्या १५ वर्षी अनिश भनवालाची सोनेरी कामगिरी, राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये ठरला पदक मिळवणारा सर्वात तरुण भारतीय

अंतिम फेरीत अनिशने ४० पैकी ३० गुणांची कमाई करत आपलं पहिलं स्थान कायम राखलं.

सुवर्णपदक विजेता अनिश भनवाला

ऑस्ट्रेलियातील गोल्डकोस्ट येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या अनिश भनवालाने ऐतिहासीक कामगिरीची नोंद केली आहे. १५ वर्षीय अनिशने २५. मी रॅपिड फायर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. या कामगिरीसह अनिश भारताकडून सर्वात कमी वयात सुवर्णपदक मिळवणारा खेळाडू ठरला आहे.

अंतिम फेरीत अनिशने ४० पैकी ३० गुणांची कमाई करत आपलं पहिलं स्थान कायम राखलं. अनिशच्या कामगिरीने भारताच्या खात्यात १६ व्या सुवर्णपदकाची भर टाकलेली आहे. ग्लास्गोत भारताला १५ सुवर्णपदकांवर समाधान मानावं लागलं होतं. अनिशच्या पदकामुळे भारताने आपलाच विक्रम मोडीत काढला आहे. अंतिम फेरीत अनिशने पाचही संधींचं सोन करुन सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. जीतू राय, मनू भाकेर, हिना सिद्धु, तेजस्विनी सावंत, श्रेयसी सिंहपाठोपाठ अनिश या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारा सहावा नेमबाज ठरला आहे.

अनिशच्या या कामगिरीनंतर अनेक मान्यवरांनी त्याचं कौतुक केलं आहे.

अनिश सध्या दहावीत शिकत असून, त्याने राष्ट्रकुल स्पर्धेत खेळण्यासाठी बोर्डाची परीक्षा नंतर देण्याचा निर्णय घेतला. यासाठी अनिशची विनंती मान्य करत सीबीएससी बोर्डाने अनिशची परीक्षा एक महिना उशीरा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रकुल स्पर्धेपाठोपाठ आपल्या दहावीच्या परीक्षेतही अनिश अशीच सोन्यासारखी कामगिरी करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

First Published on April 13, 2018 12:27 pm

Web Title: cwg 2018 anish bhanwala 15 becomes indias youngest commonwealth games medalist