ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या दिपक लाथेरने, दुसऱ्या दिवशी कांस्यपदकाची कमाई केली. संजिता चानूने मिळवलेल्या सुवर्णपदकानंतर दिपकने भारताला एक कांस्यपदक मिळवून दिलं. या कामगिरीसह दिपक राष्ट्रकुल स्पर्धेत पदक मिळवणारा सर्वात तरुण अॅथलिट ठरला आहे. हरियाणाचा रहिवासी असलेल्या १८ वर्षीय दिपकने २९५ किलो वजन उचलत कांस्यपदक आपल्या नावे केलं.

अवश्य वाचा – राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८, ऑस्ट्रेलिया: दिपक लाथेरला कांस्यपदक, वेटलिफ्टर्सची धडाकेबाज कामगिरी सुरुच

पहिली राष्ट्रकुल स्पर्धा खेळणाऱ्या दिपकने स्नॅच प्रकारात १३६ किलो वजन उचलत पदकांच्या शर्यतीत आपलं स्थान कायम राखलं. यानंतरच्या फेरीत पहिल्या दोन प्रयत्नांमध्ये दिपकने चांगली कामगिरी केली, मात्र तिसऱ्या प्रयत्नात दिपकला अपयश आलं. अखेरच्या फेरीत दिपकने १५९ किलो वजन उचललं. याचसोबत अन्य खेळाडूंनी केलेल्या खराब कामगिरीमुळे दिपकचं कांस्यपदक निश्चीत झालं.

हरियाणाच्या जिंद जिल्ह्याचा रहिवासी असलेला दिपक, राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला पदक मिळवून देणारा चौथा अॅथलिट ठरला आहे. याआधी पी. गुरुराजा, मीराबाई चानू, संजिता चानू यांनी भारताला पदकं मिळवून दिली आहेत. मीराबाई आणि संजिता यांनी आपापल्या प्रकारात सुवर्ण तर गुरुराजाने कांस्यपदकाची कमाई केली आहे.