18 January 2019

News Flash

बॉक्सिंग : नमन, मनोज व महम्मद यांना कांस्य

मनोजला ६९ किलो गटात इंग्लंडच्या पॅट मॅककोर्गाकने उपांत्य फेरीत पराभूत केले.

नमन तन्वर

भारताचे पाच खेळाडू अंतिम फेरीत

अमित पंघाल, गौरव सोलंकी व मनीष कौशिक या भारताच्या युवा खेळाडूंबरोबरच सतीश कुमार व विकास कृष्णन यांनी बॉक्सिंगच्या अंतिम फेरीकडे वाटचाल करीत किमान पाच रौप्यपदकांची खात्री केली. मात्र नमन तन्वर, मनोजकुमार व महम्मद हुसामुद्दिन यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

मनोजला ६९ किलो गटात इंग्लंडच्या पॅट मॅककोर्गाकने उपांत्य फेरीत पराभूत केले. महम्मदला इंग्लंडच्या पीटर मॅकग्रिलकडून उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला. नमनला ९१ किलो गटात स्थानिक खेळाडू जेसन व्हॅटलीविरुद्ध चिवट लढतीनंतर पराभव पत्करावा लागला. नमनने युवा गटाच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही कांस्यपदक मिळवले होते.

विजेतेपदाचा दावेदार असलेल्या विकासने ७५ किलो गटात उत्तर आर्यलडच्या स्टीव्हन डॉनेलीवर मात केली. त्याला अंतिम फेरीत कॅमेरूनच्या विल्फ्रेड दिउदोनीचे आव्हान असणार आहे. ९१ किलो गटात सतीश कुमारने सेशैल्सच्या कॅडी अ‍ॅग्नेसला सहज गारद केले व अंतिम फेरी गाठली. त्याला अजिंक्यपदासाठी इंग्लंडच्या फ्रेझर क्लार्कबरोबर झुंज द्यावी लागणार आहे.

लाइटवेट (६० किलो) गटात मनीषने उत्तर आर्यलडच्या जेम्स मॅकगिव्हर्नवर ४-१ अशी मात केली. २२ वर्षीय मनीषने आशियाई निमंत्रितांच्या बॉक्सिंग स्पर्धेत विजेतेपद मिळवले होते. मात्र जेम्सविरुद्ध त्याला अनेक वेळा बचावात्मक खेळ करावा लागला, तरीही त्याने अनेक वेळा आक्रमक चाली करीत अधिकाधिक गुण घेण्याचा प्रयत्न केला. त्याला अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाच्या हॅरी गार्सिडशी खेळावे लागणार आहे. या लढतीबाबत मनीष म्हणाला, ‘‘प्रतिस्पर्धी खेळाडूच्या चुकांवर लक्ष केंद्रित करीत त्यानुसार आक्रमक चालींची व्यूहरचना करण्याबाबत मला प्रशिक्षकांनी सुचवले आहे.’’

गौरवने ५२ किलो गटात श्रीलंकेच्या ईशान बंदारावर मात केली. सुरुवातीच्या खराब कामगिरीनंतर त्याने खेळावर नियंत्रण मिळवत विजयश्री खेचून आणली. त्याला अंतिम लढतीत उत्तर आर्यलडच्या ब्रेन्डन आयर्विनशी खेळावे लागणार आहे.

गौरवच्या तुलनेत अमितने युगांडाच्या जुमा मिईरोवर दणदणीत विजय मिळवला. अंतिम फेरीबाबत आत्मविश्वास व्यक्त करीत अमित म्हणाला, ‘‘मी डाव्या हाताने जोरदार ठोसे मारतो व त्याचाच मला लाभ झाला. अंतिम फेरीचे कोणतेही दडपण मी घेतलेले नाही.’’

First Published on April 14, 2018 3:19 am

Web Title: cwg 2018 five indians reach finals bronze each for naman manoj and hussamuddin