टेबल टेनिसपाठोपाठ भारतीय बॅडमिंटन संघानेही राष्ट्रकुल स्पर्धेत आपल्या नावावर एक पदक निश्चीत केलं आहे. आज झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने सिंगापूरवर ३-१ अशी मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत भारताला इंग्लंड विरुद्ध मलेशिया यांच्यातील विजेत्याचा सामना करायचा आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी उद्या खेळवली जाणार आहे.

अवश्य वाचा – राष्ट्रकुल स्पर्धा २०१८, ऑस्ट्रेलिया – सुपरसंडे!! पुनम यादव पाठोपाठ नेमबाजीत मनु भाकेरला सुवर्णपदक

२०१४ साली ग्लास्गो शहरात झालेल्या राष्ट्रकुल खेळांमध्ये सिंगापूरच्या संघाने भारतावर २-३ अशी मात करत कांस्यपदकाच्या लढाईत बाजी मारली होती. या पराभवाचा भारताने आज बदला घेतला आहे. आजच्या सामन्यात सायना नेहवालने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत सिंगापूरच्या जिया मिन येऊवर २१-८, २१-१५ अशी मात केली. पहिल्या मिश्र दुहेरी सामन्यात भारताच्या सत्विक रणकीरेड्डी आणि आश्विनी पोनाप्पा यांनी आपल्या प्रतिस्पर्धी जोडीवर मात करुन १-० अशी आघाडी घेतली. यानंतर किदम्बी श्रीकांतनेही एकेरीचा सामना जिंकत भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली.

अवश्य वाचा – भारतीय महिला हॉकी संघाची इंग्लंडवर मात, उपांत्य फेरीच्या शर्यतीतलं आव्हान कायम

यावेळी २-० ने पिछाडीवर पडलेल्या सिंगापूरने दुहेरी सामन्यात भारताच्या जोडीवर मात करत सामन्यात दमदार पुनरागमन केलं. त्यामुळे पुढच्या सामन्यांमध्ये विजय मिळवत सिंगापूर सामन्यात पुनरागमन करतं की काय असं वाटत असताना, सायना नेहवालने एकेरी सामना जिंकत भारताची आघाडी ३-१ ने वाढवत अंतिम फेरीतला प्रवेश निश्चीत केला. त्यामुळे उद्या होणाऱ्या अंतिम फेरीत भारतीय संघ सुवर्णपदक मिळवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – इंग्लंडवर मात करुन भारतीय महिला अंतिम फेरीत, टेबल टेनिसमध्ये भारताचं एक पदक निश्चीत