भारताची टेबल टेनिसपटू मनिका बत्राने ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल खेळांमध्ये ऐतिहासीक कामगिरीची नोंद केली आहे. टेबल टेनिसच्या एकेरी प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई करणारी मनिका बत्रा पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे. मनिकाने अंतिम फेरीत सिंगापूरच्या प्रतिस्पर्धी खेळाडूवर ११-७, ११-६, ११-२, ११-७ अशी मात करत सुवर्णपदक आपल्या नावावर निश्चीत केलं. या राष्ट्रकुल स्पर्धेतलं मनिका बत्राचं हे तिसरं पदक ठरलं आहे. भारतीय महिलांनी सांघिक प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केली. या संघातही मनिका बत्राने भारताच्या विजयात मोठा हातभार लावला होता. यानंतर महिला दुहेरी सामन्या मौमा दासच्या साथीने खेळताना मनिका बत्राला अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता, यामुळे भारताला या प्रकारात रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं होतं. यानंतर आज एकेरीच्या अंतिम सामन्यात मनिका बत्राने पुन्हा एकदा धडाकेबाज कामगिरी करत सुवर्ण पदक आपल्या नावावर जमा केलं.

दहाव्या  दिवशी भारतीय खेळाडूंनी केलेल्या कामगिरीमुळे पदकतालिकेतलं भारताचं तिसरं स्थान अजुन भक्कम झालं आहे. सध्या भारत २४ सुवर्ण पदकांसह तिसऱ्या स्थानावर कायम आहे. या स्पर्धेचा उद्या अंतिम दिवस आहे. त्यामुळे उद्या भारतीय खेळाडू आपल्या खात्यात किती पदकांची भर घालतात हे पहावं लागणार आहे. सध्या भारताच्या खात्यात ५५ पदकं जमा आहेत.