राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने दमदार कामगिरी करत एकूण ६६ पदकांची कमाई केली. यामध्ये २६ सुवर्ण, २० रौप्य, आणि २० कांस्य पदकांचा समावेश आहे. राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सर्वाधिक पदक मिळवणाऱ्या देशांच्या यादीमध्ये भारताने या ६६ पदकांसहीत तिसरे स्थान पटकावले आहे. ऑस्ट्रेलिया १९८ पदके (८० सुवर्ण, ५९ रौप्य आणि ५९ कांस्य) आणि इंग्लंड १३६ पदके (४५ सुवर्ण, ४५ रौप्य आणि ४६ कांस्य) हे दोन देश या यादीमध्ये अव्वल स्थानी आहेत. विशेष म्हणजे मनिका बत्रा ही यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारतासाठी सर्वाधिक पदके जिंकणारी खेळाडू ठरली आहे. तिने दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशा चार पदकांची कमाई केली आहे. म्हणजेच सर्वाधिक पदके जिंकणाऱ्या देशांच्या यादीमध्ये मनिकाचे नाव लिहायचे ठरवल्यास ती १८ व्या स्थानी असेल. म्हणजेच पदकांच्या यादीच्या दृष्टीने राष्ट्रकुलमध्ये सहभागी झालेल्या ७१ देशांपैकी ५३ देशांहून मेनकाची कामगिरी सरस राहिली आहे असे म्हणता येईल.

भारताच्या टेबल टेनिसपटूंनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदक धडाकाच लावला. राष्ट्रकुल स्पर्धेच्या शेवटच्या दिवशीही टेबल टेनिसपटूंनी दोन कांस्यपदक आपली नावे कोरली. दहा सदस्यीय टेबल टेनिस संघाने एकूण ८ पदकांची कमाई केली. त्यात तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि तीन कांस्यपदकांचा समावेश आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील ही ऐतिहासिक कामगिरी ठरली. या आठ पैकी चार पदके बत्राच्या नावे आहेत. शेवटच्या दिवशी मिश्र दुहेरीच्या कांस्यपदकाच्या लढतीत जी. साथियनसह तिने भारताच्याच अचंता शरथ कमल व मौमा दास या जोडीचा ११-६, ११-२, ११-४ असा पराभव करत चौथे पदक आपल्या नावे केले. यापूर्वी तिने महिला एकेरीच्या ऐतिहासिक सुवर्णपदकासह महिला सांघिक गटात बाजी मारली होती. तसेच महिला दुहेरीत मौमा दासच्या साथीने रौप्यपदकाची कमाई केली.

सर्वाधिक पदके कमावणाऱ्या देशांच्या यादीत मनिकाचे नाव घ्यायचे झाल्यास ती अठराव्या स्थानी असेल. अठरव्या स्थानी असणाऱ्या त्रिनिनाद आणि टोबॅगो या देशाने दोन सुवर्ण आणि एका रौप्य पदकाची कमाई केली आहे. विशेष म्हणजे या यादीमध्ये भारताचा शेजारी असणाऱ्या पाकिस्तान २५व्या स्थानी आहे. पाकिस्तानने या स्पर्धेमध्ये एक सुवर्ण आणि चार कांस्य अशा एकूण पाच पदकांची कमाई केली आहे. म्हणजेच या यादीमध्ये मेनकाची कामगिरी पाकिस्तानच्या कामगिरीपेक्षा सरस असून ती पाकिस्तानपेक्षा सात स्थानांनी पुढे आहे असेही म्हणता येईल. तसेच दोन रौप्य पदकासहित या यादीतमध्ये ३०व्या स्थानी असणाऱ्या बांगलादेशपेक्षा मेनका १२ स्थानांनी वरचढ ठरली असती.

आमचे लक्ष्य टोकियो ऑलिम्पिक: मनिका बत्रा

राष्ट्रकुल स्पर्धेनंतर बत्राने २०२०चे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा लक्ष्य असल्याचे सांगितले. ती म्हणाली, ‘‘मिश्र दुहेरीत साथियनसोबत २०२०च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्याची इच्छा आहे. आम्ही सर्वोत्तम खेळ केला, परंतु दुर्दैवाने मिश्र दुहेरीसाठी अधिकच्या स्पर्धा नाहीत. आम्ही पोर्तुगालमध्ये सराव करत आहोत आणि हे आमचे मिश्र दुहेरीतील पहिले पदक आहे.’’