वर्ल्ड चॅंपियन मीराबाई चानू हिने ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरु असणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सुवर्ण कामगिरी करत देशाला आनंद साजरा करण्याची एक सुवर्णसंधी दिली आहे. ४८ किलो वजनी गटातील वेटलिफ्टींग प्रकारात आपली छाप पाडत मिळालेल्या सर्व संधीचं मीराबाईने खऱ्या अर्थाने सोनं केलं आणि भारतीय गटात सुवर्णपदकाची भर दिली.

राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये मिळालेल्या यशाबद्दल सोशल मीडियावरही मीराबाईच्याच नावाचा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आल्याचं पाहायला मिळालं. क्रिकेटवेड्टा आपल्या देशात प्रत्येक खेळाचा तितकच महत्त्वं दिलं जातं याचा प्रत्ययही यावेळी आला. बॉक्सिंगमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारी मेरी कोम, क्रिकेटर सुरेश रैना यांच्यासोबतच अभिनेते अमिताभ बच्चन आणि केंद्रातील मंत्र्यांनीही तिला शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळालं. मीराबाई तुझं खूप खूप अभिनंदन. आज आम्हाला तुझा अभिमान वाटतोय, असं ट्विट करत बिग बींनी तिचं कौतुक केलं. तर ही फक्त सुरुवात आहे, असं म्हणत सुरेश रैनाने आणखी पदकांची आशा करत असल्याचं ट्विटच्या माध्यमातून म्हटलं.