ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पदकाची लयलूट सुरु ठेवली आहे. पाचव्या दिवशी भारतीय नेमबाजपटू जीतू रायने १० मी. एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. अतिशय अटीतटीच्या झालेल्या सामन्यात जितू रायने ऑस्ट्रेलियन प्रतिस्पर्ध्याची झुंज मोडून काढत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. मात्र जीतू रायला अंतिम फेरीत सुवर्णपदक आपणच जिंकणार असा आत्मविश्वास होता.

“प्राथमिक फेरीत मी चांगला खेळ केला नाही. मात्र मला माझ्या खेळावर पूर्णपणे विश्वास होता. मी याआधीही महत्वाच्या स्पर्धांच्या अंतिम फेरीत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे रौप्य पदकाचा विचारही माझ्या मनात आली नाही. सुवर्णपदक जिंकणार याची मला खात्रीच होती.” पदक समारोह पार पडल्यानंतर जीतू रायने पत्रकारांशी संवाद साधला. अंतिम फेरीत जीतूने २३५.१ गुणांची कमाई केली.

आतापर्यंत मी जी मेहनत घेतली त्याचं फळ मला मिळालं आहे. अंतिम फेरीत मधल्या काही संधींमध्ये माझे गुण कमी झाले होते. मात्र माझ्या विश्वासाच्या जोरावर मी सामन्यात पुनरागमन केल्याचं जीतू रायने पुन्हा एकदा नमूद केलं. जीतू रायसोबत भारताच्या ओम मिथरवालने १० मी. एअर पिस्तुल प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली.