ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरु असणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंनी उल्लेखनीय कामगिरी बजावत अप्रतिम खेळाचं प्रदर्शन केलं आहे. सांघिक प्रकारच्या सामन्यांमध्ये भारतीय संघातील खेळाडूंनी मलेशियाच्या संघावर ३- १ अशा गुणसंख्येने मात केली. मलेशियाच्या संघावर मात करत भारतीय संघाने सुवर्णपदकाची कमाई इतिहास रचला आहे.

राष्ट्रकुल स्पर्धांमधील सांघिक बॅडमिंटन प्रकारात भारतीय संघाने पहिल्यांदाच सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. भारतीय संघाकडून मिश्र दुहेरीमध्ये सात्विक रणकीरेड्डी आणि अश्विनी पोनप्पा, पुरुष एकेरीमध्ये किदंबी श्रीकांत आणि महिला एकेरी सामन्यामध्ये सायना नेहवाल या खेळाडूंच्या कामगिरीमुळे हे यश संपादन करणं सहज शक्य झालं.

वाचा : नायजेरियावर मात करुन भारतीय पुरुषांची सुवर्णपदकाची कमाई

सांघिक प्रकारारात खेळवल्या गेलेल्या या सामन्यांमध्ये पहिल्या मिश्र दुहेरीत सात्विक रणकीरेड्डी आणि अश्विनी पोनप्पाने मलेशियाच्या पेंग सुन आणि ल्यू यिंग यांचा २१-१४, १५-२१ आणि २१-१५ अशा फरकाने पराभव केला. तर दुसऱ्या सामन्या किदंबी श्रीकांतने मलेशियाच्या ली चोंग वेई या स्टार खेळाडूचा २१-१७ आणि २१-१४ असा धुव्वा उडवला. सांघिक प्रकारातील तिसऱ्या सामन्यात सात्विक रणकीरेड्डी आणि चिराग या दोन्ही खेळाडूंनी मलेशियाच्या जोडीचा २१-१५ आणि २२-२० असा पराभव केला. तर चौथ्या सामन्यात फुलराणी, सायना नेहवालच्या खेळाने चाहत्यांची मनं जिंकली. मलेशियाच्या सोनिया चेहला सायनाने पराभूत करत तिसऱ्या गेममध्ये २१-९ अशा फरकाने विजय मिळवला आणि भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्णपदकाची भर पडली.