ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या तेजस्विनी सावंतने सुवर्णपदकाची कमाई केली. या स्पर्धेतलं तेजस्विनीचं हे पहिलं सुवर्णपदक ठरलं आहे. राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये ५० मी. रायफल थ्री पोजीशन प्रकारात विक्रमी गुणांची नोंद करत तेजस्विनीने पदकांच्या शर्यतीत भारताचं तिसरं स्थान कायम राखलं आहे. तेजस्विनीने ४५७.९ गुणांची कमाई करत आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे सोडलं. काल तेजस्विनीने ५० मी. रायफल प्रोन प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली होती.

तेजस्विनी सावंत व्यतिरीक्त भारताच्या अंजुम मुद्गीलने रौप्यपदकाची कमाई केली. अंजुमने ४५५.७ गुण करत भारताला रौप्यपदकाची कमाई करुन दिली. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचं तिसऱ्यांना प्रतिनिधीत्व करणाऱ्या तेजस्विनीने प्राथमिक फेरीतली सर्वोत्तम कामगिरी बजावत अंतिम फेरीत आपलं स्थान पक्क केलं होतं. त्यामुळे वेटलिफ्टींग, कुस्ती पाठोपाठ नेमबाजीतही भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी करत पदकांची लयलूट सुरु ठेवली आहे.