गोल्ड कोस्टमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला टेबल टेनिस संघाने आपलं एक पदक निश्चीत केलं आहे. महिला सांघिक प्रकारात भारतीय संघाने इंग्लंडचा ३-० ने धुव्वा उडवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत भारतीय महिलांची गाठ सिंगापूरच्या महिलांशी पडणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत भारताच्या पदरी जरी पराभव पडला, तरीही भारताच्या खात्यात एक रौप्यपदक जमा होणार आहे. मात्र पहिल्या फेरीपासून धडाकेबाज खेळी करणाऱ्या भारतीय महिला अंतिम फेरीत सुवर्णपदकासाठीच खेळतील यात शंका नाही.

अवश्य वाचा – राष्ट्रकुल स्पर्धा २०१८, ऑस्ट्रेलिया – सुपरसंडे!! पुनम यादव पाठोपाठ नेमबाजीत मनु भाकेरला सुवर्णपदक

सलामीच्या सामन्यात मनिका बात्राला पहिला सेट गमवावा लागला, यामुळे भारतीय चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता. मात्र यानंतरच्या दोन सेटमध्ये दमदार पुनरागमन करत मनिका बात्राने इंग्लंडच्या केली सिबलेवर मात करत भारताला सामन्यात १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर मधुरिका पाटकरने मात्र आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूला डोकं वर काढण्याची संधी न देता विजय मिळवत भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली.

यानंतर अखेरच्या दुहेरी फेरीत भारताच्या मौमा दास आणि मधुरिका पाटकरने इंग्लंडच्या मारिया आणि केली सिबलेचा ११-७, ८-११, ११-७ आणि ११-१ असा पराभव करत सामन्यात ३-० अशी विजयी आघाडी घेतली. अंतिम फेरीत भारतीय महिला संघाचा सामना सिंगापूरशी होणार आहे.

अवश्य वाचा – भारतीय महिला हॉकी संघाची इंग्लंडवर मात, उपांत्य फेरीच्या शर्यतीतलं आव्हान कायम